पाकिस्तानला IMF नंतर आता आशियाई विकास बँक देणार ८०० दशलक्ष डॉलर्स   

नवी दिल्ली : पाकिस्तानला ९ मे रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज तात्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. आयएमएफच्या या निर्णयाला भारताने विरोध केला होता.
 
आयएमएफनंतर आता आशियाई विकास बँक पाकिस्तानला तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्स देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या विरोधानंतरही एडीबीनेही हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादासाठी वित्तपुरवठा करण्याची शक्यता भारताने वर्तवत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीला तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, तरीही आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानसाठी ८०० दशलक्ष डॉलर्सचे  'बेलआउट' पॅकेज मंजूर केल्याने भारतासाठी हा धक्का मानला जात आहे.
 
भारताचा विरोध झुगारून पाकिस्तानने आशियाई विकास बँकेकडून तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्सची ही मदत मिळवली आहे. सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे पैसे मंजूर केल्याचे वृत्तात म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बऱ्याच जागतिक कर्ज देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधत पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा उघड करत भविष्यात पाकिस्तानला होणारी आर्थिक मदत थांबवण्याचे आवाहन केले होते. 
 
भारताने आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानला होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेतला असून या आर्थिक मदतीच्या गैरवापराबद्दल भारताने चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जाते. भारताला भीती आहे की एडीबी आणि इतर आंतरराष्ट्रीय कर्जदात्यांकडून पाकिस्तानने घेतलेलं कर्ज विकासाऐवजी लष्करी खर्चाकडे वळवले जाऊ शकते. या अनुषंगाने एडीबीसमोर भारताने आपल्या सादरीकरणात असे निदर्शनास आणून दिले आहे की, एडीबी आणि आयएमएफकडून बऱ्याचदा कर्ज घेतल्यानंतरही पाकिस्तान प्रमुख आर्थिक सुधारणा लागू करण्यात वारंवार अपयशी ठरले आहे.
 

Related Articles