रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’   

अलिबाग : भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. ‘यंत्रराज’ म्हणजेच सौम्ययंत्र नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण रायगडावर आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती  यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन प्रगत आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर झाल्याचे संकेत मिळत आहेत.
 
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खगोलशास्त्रीय अभ्यास करून रायगडाचे बांधकाम तत्कालीन अत्याधुनिक पद्धतीने झाले होते, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. ‘यंत्रराज’ हे उपकरण प्राचीन काळापासून ग्रह-तार्‍यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशा शोधण्यासाठी आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांसारख्या खगोलीय गोष्टींचा अभ्यास करणे या यंत्रामुळे सोपे होत असे. रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
 
मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात १० ते १२ ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहसिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबविले असता त्याठिकाणीच हे प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. या ‘यंत्रराज’ उपकरणावर काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी कासव किंवा सापासारख्या दोन प्राण्यांचे अंकन आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कोणत्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी उपकरणाच्या वरच्या बाजूला ‘मुख’ आणि ‘पूंछ’ असे शब्द कोरलेले आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा ओळखणे सोपे होत असावे, असा अंदाज आहे. या अमूल्य शोधाने इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 

Related Articles