सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली   

तीन जवानांचा मृत्यू ; सहा बेपत्ता

गंगटोक : सिक्कीमच्या छाटेन येथील लष्कराच्या तळावर दरड कोसळून तीन जवानांचा मृत्यू तर सहा बेपत्ता झाले. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास मंगन जिल्ह्यातील लाचेन शहरात दुर्घटना घडली. दरम्यान, याच परिसरात हजारोंच्या संख्येने पर्यटक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्याचे काम वेगाने सुरू आहे. काल १०० पर्यटकांची सुटका प्रशासन आणि सुरक्षा जवानांनी केली असून त्यांना गंगटोक येथे सुखरूप आणले आहे. 
 
परिसरात काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाली होती. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसानंतर काल सायंकाळी दरड कोसळली होती. त्यात लष्कराचे तीन जवानांचा मृत्यू झाला. हवालदार लखविंदर सिंग, लान्स नायक मुनीष ठाकूर आणि मालवाहक अभिषेक लाखडा, अशी त्यांची नावे आहेत त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. चार जवान किरकोळ जखमी झाले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. दुर्घटनेनंतर मदतकार्य वेगाने राबविले जात आहे. सहा बेपत्ता जवानांचा शोध घेतला जात आहे. जवानांच्या मृत्यूबद्दल लष्कराने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत. घटनास्थळी आवश्यक ती मदत तातडीने पाठवली जात असून मदतकार्य राबविल्याची माहितीही अधिकार्‍यांनी दिली.

पावसाचा हजारो पर्यटकांना फटका

सिक्कीमला गेलेल्या हजारो पर्यटकांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात अठरा वाहनांतून १०० पर्यटकांची उत्तरेकडील लाचंग येथून सुटका करण्यात आली आहे. त्यांना लोअर डोंजगूील फिंडांग येथे आणले गेले आहे. 
 
मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांच्या नेतृत्वाखाली पर्यटकांची वाहने फिडांग येथे आणली आहेत. यानंतर  पर्यटक गंगटोकडे रवाना होतील. दरम्यान, पर्यटकांच्या सुटकेचे काम काल सकाळपासून हाती घेतले होते. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि लष्कर, बीआरओ, इंडो तिबेटियन पोलिस दल, वन विभाग, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी पर्यटकांच्या सुटकेसाठी धाव घेतली. 
 
दरम्यान, अन्य पर्यटक वाहनांच्या ताफ्यात २८४ वाहने आणि, १६ दुचाकी आहेत. १ हजार ६७८ पर्यटकांमध्ये ७३७ पुरुष, ६६१ महिला आणि ३८० मुले आहेत. ही सर्व मंडळी थंेंंग तपासणी नाका ओलांडून फिडांगकडे रवाना झाली आहेत. 
 
जिल्हाधिकारी जैन यांनी सांगितले की, पर्यटकांच्या सुटकेसाठी सर्व ते प्रयत्न युद्धपातळीवर केले जात आहे. पर्यटकांना लाचुंग येथून सुरक्षित बाहेर काढले जात आहे. ते लाचुंंग -चुगंथंग- सिफग्यार- फिडांग मार्गे गंगटोकडे येत आहेत  पर्यटक प्रामुख्याने मुसळधार पावसामुळे लाचुंंग येेथे अडकले आहेत. मांगन जिल्ह्यातील दोन पुलांचे नुकसान झाले. 
 
उत्तर सिक्कीमध्ये ३० मे रोजी ढगफूटी झाली होती. त्यानंतर मुसळधार वृष्टी झाली होती. त्याचा परिसराला आणि पर्यटकांना मोठा फटका बसल्याचे बीआरओच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस अधिकारी अक्षय सचदेव यांनी लाचुंग येथून आलेल्या पर्यटकांचे स्वागत केले.  या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी ताशी वँग्याल, गंगटोकेचे वरिष्ठ अधिकारी प्रताप प्रधान, पोलिस अधीक्षक मांगन डेटचू भुतिया आदी उपस्थित होते. 
 

Related Articles