सावरकरांची खोली पाहण्यासाठी खुली   

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली त्यांच्या जयंती निमित्त येत्या बुधवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी खुली राहणार आहे.
 
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात १९०२ ते १९०५ या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकरांनी वास्तव्य केले होते.  ते वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत असत.  ही खोली त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि उपक्रमांची साक्षीदार आहे. या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे दोन गणवेश, त्यांच्या वापरातील वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या खोलीत सावरकरांनी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारी उपक्रमांची योजना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन करून ठेवले आहे.  सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते.  ही खोली सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाची साक्ष देणारी असून, आजही ती प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाते.
 

Related Articles