‘सीआयएससीई’त मुलींनीच मारली बाजी   

दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल 

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांचा निकाल जाहीर केला. दहावीचा निकाल  ९९.०९ टक्के तर, बारावीचा निकाल ९९.०२ टक्के लागला. महाराष्ट्राचा दहावीचा निकाल ९९.९० टक्के, तर बारावीचा निकाल ९९.८१ टक्के लागला.
 
यंदा देशभरातील २ हजार ८०३ शाळांतून २ लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दहावीची, तर १ हजार ४६० शाळांतून ९९ हजार ५५१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात दहावीचे २ लाख ५० हजार २४९ विद्यार्थी, तर बारावीचे ९८ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. दहावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.३७ टक्के होते, तर ९८.८४ टक्के मुले उत्तीर्ण झाले. तसेच बारावीच्या परीक्षेत ९९.४५ टक्के मुली, तर ९८.६४ टक्के मुले उत्तीर्ण झाले.
 
दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने ९९.८३ टक्क्यांसह आघाडी घेतली. त्या खालोखाल दक्षिण विभागाचा ९९.७३ टक्के लागला. उत्तर विभागाचा ९८.७८ टक्के, पूर्व विभागाचा ९८.७० टक्के, तर परदेशी विद्यार्थ्यांचा ९३.३९ टक्के निकाल लागला. तर बारावीच्या परीक्षेत दक्षिण विभागाचा ९९.७६ टक्के, पश्चिम विभागाचा ९९.७२ टक्के, पूर्व विभागाचा ९८.७६ टक्के, उत्तर विभागाचा ९८.९७ टक्के, परदेशी विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल लागला.
 
राज्याचा दहावीचा निकाल ९९.९० टक्के, तर बारावीचा निकाल ९९.८१ टक्के लागला. २७० शाळांतून दहावीची परीक्षा दिलेल्या २९ हजार २८२ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १ हजार ७०४ मुले, तर १३ हजार ५५० मुलींचा समावेश आहे. ७७ शाळांतून बारावीची परीक्षा दिलेल्या तीन हजार ७२३ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक हजार ७१२ मुले, तर दोन हजार चार मुली आहेत. राज्यातही दहावी आणि बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे.

Related Articles