वाहनांच्या सुट्या भागाच्या निर्यातीत वाढ   

वृत्तवेध

सेमीकंडक्टर मार्केटमध्ये येणारा काळ भारताचा असणार आहे. कारण देश खूप वेगाने प्रगती करत आहे. ‘नीती आयोगा’चा अंदाज आहे की देशातील ऑटो पार्ट उद्योग म्हणजेच ऑटोमोटिव्ह घटक क्षेत्र २०३० पर्यंत १४५ अब्ज डॉलरच्या आकड्याला स्पर्श करू शकेल. अहवालात असेही म्हटले आहे की भारताची ऑटो पार्टसची निर्यात तिपटीने वाढून ६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही निर्यात सध्या २० अब्ज डॉलर इतकी आहे. सेमीकंडक्टर म्हणजे मोबाईल, संगणक आणि वाहने यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये वापरण्यात येणारी चिप. भारतातील सेमीकंडक्टर बाजारपेठ दर वर्षी १५ टक्के दराने म्हणजे दुप्पट दराने वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. 
 
२०२३ मध्ये जगभरात अंदाजे ९४ दशलक्ष म्हणजेच ९.४ कोटी वाहने तयार करण्यात आली. त्याच वेळी, जागतिक ऑटो पार्टसची बाजारपेठ सुमारे दोन ट्रिलियन डॉलरची होती. त्यात ७०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचाही समावेश होता. चीन, अमेरिका आणि जपाननंतर भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे. देशात दर वर्षी सुमारे ६० लाख वाहनांची निर्मिती होते. भारताने विशेषतः छोट्या मोटारी आणि युटिलिटी वाहनांच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेवर वरचष्मा निर्माण केला आहे. भारतातील सेमीकंडक्टर बाजार जगाच्या तुलनेत खूप वेगाने वाढत आहे. यातून २०३० पर्यंत सुमारे १३ अब्ज डॉलर इतका महसूल मिळू शकेल. सध्या जगातील अर्धसंवाहक चिप्सपैकी फक्त ०.१ टक्के भारतात तयार होतात. भारत अर्धसंवाहक तयार करण्यासाठी लागणार्‍या मशीनवर सुमारे एक टक्का रक्कम खर्च करतो; पण सेमीकंडक्टर्सच्या जगातील मागणीपैकी ६.५ टक्के मागणी भारतात आहे. सध्या भारतात चिप्सचे उत्पादन कमी होत असले तरी येत्या काळात त्याची मोठी बाजारपेठ बनणार आहे.
 
अनेक कंपन्या आपला व्यवसाय चीनमधून हलवत आहेत. त्यामुळे दरवाढीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ‘चायना प्लस वन’ रणनीती अंतर्गत काही कंपन्या चीनबाहेरही कार्यरत आहेत. म्हणजे त्यांचे उत्त्पादन चीनशिवाय दुसर्‍या देशात होते.

Related Articles