खासगी सोसायट्यांमध्ये होणार वृक्षांचे रोपण महापालिकाचा उपक्रम   

पुणे : रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणार्‍या झाडांच्या बदल्यात आता खासगी सोसायटीच्या जागेत वृक्ष लावले जाणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाने सुरु केलेल्या या उपक्रमाला खासगी सोसायटी आणि संस्थांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे.
 
महापालिकेच्या  पथ-विभागामार्फत रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत असल्याने काढाव्या लागणार्‍या वृक्षांच्या बदल्यात नियमाप्रमाणे स्थानिक जातींचे नवीन वृक्ष लावले जातात .  स्थानिक जातीचे जास्तीत जास्त वृक्ष परिसरात लावल्यास शहराच्या पर्यावरणास विविध प्रकारचे फायदे होऊन येत्या काही वर्षात शहराची ओळख ‘हरित पुणे’ अशी होईल असे मत अनेक नागरिकांचे, सेवाभावी संस्थांचे आहे. पथ विभागाने खाजगी सोसायटीच्या आवारातही वृक्षारोपण केल्यास सदर वृक्षांची देखभाल संबंधित सोसायटीमार्फत करण्यास अनेक सोसायटी धारकांनी तयारी दर्शवली  आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
 
रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणार्‍या वृक्षांच्या बदल्यात नियमाप्रमाणे लावावे लागणारे स्थानिक जातींचे साधारण ५-६ फूट उंचीचे वृक्ष पुणे महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला  तसेच खाजगी सोसायटीच्या आवारात लावण्यात येणार आहे. त्यांचे जिओ टॅगिंग देखील करण्यात येणार आहे. सदर नव्याने लावण्यात येणार्‍या वृक्षांची जातीने देखभाल करणे आवश्यक असून सदर वृक्षांचा देखभालीचा सहामाही अहवाल किमान ७ वर्षे नित्यनेमाणे सादर करणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणार्‍या झाडांची देखभाल पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे तर खाजगी सोसायटीच्या आवारात लावण्यात येणार्‍या झाडांची देखभाल संबंधित सोसायटी धारकांमार्फत करण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता काय करावे ?

  1. सद्यस्थितीत किमान ३० झाडे लावण्यास व त्यांची पुरेशी वाढ होण्यास आवश्यक जागा उपलब्ध असणार्‍याच सोसायटी अथवा संस्थांना प्राधान्य.
  2. सदर वृक्षांचे दायित्व हे हमीपत्र भरून देणार्‍या व्यक्तींचे राहील. सदर वृक्षांची जातीने देखभाल करणे आणि त्याचा सहामाही अहवाल किमान ०७ वर्षे नित्यनेमाणे सादर करावा लागणार
  3. उपक्रमामध्ये सहभागी होणार्‍या सोसायटी, संस्थांचा एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात येणार असून सदर सोसायटी, संस्था यांनी आपली मते या ग्रुपवरच मांडावीत.
  4. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता  https://forms. gle/zdJg­aKc6e7VH9Mr6 या गुगल लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म ३० एप्रिलपर्यंत भरावा.
 

Related Articles