मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा   

पुणे : मान्सूनपूर्व करावयाचे कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत. कामे करताना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
 
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डुडी यांनी आयोजित केली होती. निवासक्ष उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वनविभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदि उपस्थित होते.
 
डुडी म्हणाले, पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करून त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याचबरोबर पूर रेषेखालील येणार्‍या झोपड्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणार्‍या उपाय योजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा, धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याबाबत नागरिकांना पूर्व सूचना वेळेत मिळेल, याबाबत नियोजन करावे. सर्व धरणांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधीत गाव आदिंबाबतची माहिती सर्व सबंधित विभाग तसेच नागरिकांना द्यावी. धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पूल, रस्ते, पूरबाधीत गावांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. 
 
सर्व रस्त्यांना बाजूला पट्टे भरून घ्यावेत. पावसाळ्यात बंद रस्त्याला असलेले पर्याय, रस्त्यांबाबत माहिती नागरिकांना द्यावी, आणीबाणीच्या काळात उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटर टँकर्स, डंपर्स, अर्थमुव्हर्स, डिवॉटरिंग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फल्ड लाइट इत्यादी साहित्य चाल स्थितीत असल्याची खात्री करावी. आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल. याबाबत नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
 

Related Articles