ब्रिटिश इतिहासकारांकडून मराठ्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित   

डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन 

पुणे : मराठे हे संपूर्ण प्रांताचे रक्षक होते. अखंड हिदुस्तानाची संकल्पना प्रथम मराठ्यांनी मांडली. मराठ्यांच्या राजकारणात लवचिकता होती. ते कर्तृत्वान जाणते राज्यकर्ते होते. आताचा भारत शाबुत ठेवण्यात मराठ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र खोडसाळ ब्रिटिश इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मराठ्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले. इतिहासात त्यांच्या कार्यांच्या नोंदी टाळल्या. त्यामुळे मराठ्यांचा पहिल्या टप्यातील इतिहास दुर्लक्षित राहिला. नंतरच्या काळातील इतिहासकारांनी मराठ्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला, असे मत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले. 
 
‘वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील ‘बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यानात ‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे बोलत होते. यावेळी पेशवे यांचे वशंज जयमंगला राजे, पुष्कर पेशवा, आरती राजे, आदिती अत्रे उपस्थित होते. 
डॉ. मोरे म्हणाले, ‘ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहास लिहिताना मराठ्यांचा लुटारू असा उल्लेख केला. त्यांनी मराठ्यांच्या कर्तृत्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रजपूत आणि मोघलांना मोठे केले. मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा ब्रिटिशांनी पुसून टाकल्या. दफ्तरे जाळली, गड, किल्ल्यांना सुरूंग लावून पाडले.  मात्र नंतरच्या काळात न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे यांनी मराठठ्यांचा पराक्रमी इतिहास मांडला. ब्रिटिश इथे आले नसते, तर या संपूर्ण देशावर मराठ्यांचे राज्य असते. असे काही प्रमाणिक ब्रिटिश लेखकांनी लिहून ठेवले असल्याचेही भारतीय इतिहासकारांनी प्रकाशात आणले. विशष म्हणजे भारतीय इतिहासात बहुतेक राज्यकर्ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. मात्र एकमेव मराठे असे होते की ते दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले. त्यांनी अटकेपार झेंडा रोवला, असेही डॉ. मोरे यांनी नमूद केले. 
 
राज्यकर्ते कोणीही असो दक्षिण आणि उत्तरेत मराठ्यांशिवाय काहीच होत नव्हते. मोगलाचे साम्राज्य जागतिक पातळीवरचे होते. तरीही शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराबाईंनी मोघलांशी कायम लढा दिला. मोघलांनाही मराठ्यांचे राज्य संपविता आले नाही. राजधानी सोडून औरंगजेब इकडे आला. तब्बल २७ वर्षे प्रयत्न करूनही मराठ्यांचे साम्राज्य संपवू शकला नाही. शेवटी इकडेच त्याचा मृत्यू झाला. हे मराठ्यांचे कर्तृत्व आहे. पाणीपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभवही मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. त्यानंतर अबदाली कधीच भारतात येऊ शकला नाही. पाणीपतात मराठे जिंकले असते, तेव्हाच देशावर राज्य केले असते. दिल्लीतील मोघल नावालाच होते. त्यामुळे खर्‍या अर्थाने राज्य मराठे चालवित होते. दिल्लीत मराठे असल्यामुळे ब्रिटिश दिल्लीत पाय रोवू शकत नव्हते. कदाचित मराठे नसते तर ब्रिटिशांनी आधीच दिल्लीत तळ ठोकला असता. त्यांना नाईलाजास्तव कलकत्ता येथे मुख्यालय करावे लागले. ते कलकत्ता मार्गे दिल्लीत येत होते.पाणीपतच्या लढाईनंतर मराठ्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. ब्रिटिश आणि मराठ्यांत लढाई झाली. त्यात मराठ्यांचा पराभव झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी मोघलाकडून नव्हे, तर मराठ्यांकडून दिल्ली घेतली. मराठ्यांचा इतिहास शौर्य आणि पराक्रमाचा आहे. 
 
केवळ खोडसाळ ब्रिटिश इतिहासकारांमुळे काही काळ तो दुर्लक्षित राहिला. नंतरच्या काळात मात्र मराठ्यांचा खरा इतिहास जगासमोर आला असल्याचेही डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. 
 
प्रारंभी बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्याख्यानमालेचे कार्यकारिणी सदस्य स्वप्निल पोरे यांनी डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार केला. संपदा लोहगावकर यांनी सुत्रसंचालन केले. 
 

Related Articles