लष्करप्रमुख की दहशतवादी? (अग्रलेख)   

पाकिस्तानात धर्माच्या नावाने उन्माद माजविला जाणे नवे नाही. जिहादींच्या फौजा आयएसआय आणि तेथील लष्कराच्या पाठिंब्याने वर्षानुवर्षे उभ्या राहिल्या, हे देखील जगजाहीर आहे. हे कर्तेकरविते आपल्या या उद्योगांची जाहीर वाच्यता टाळत होते; पण आता ते लपविण्याची गरज उरली नसावी. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी द्विराष्ट्रवादाची खुलेआम केलेली भलावण तेच सांगते! मुनीर यांनी परदेशात स्थित पाकिस्तानी नागरिकांच्या कार्यक्रमात केलेली भाषा एखाद्या विषारी धर्मांधाला शोभावी अशीच आहे. त्यांचे भाषण आणि लगोलग झालेला पहलगाममधील हल्ला, यात संबंध नाही, असे मानणे भाबडेपणा ठरेल. एखाद्या देशाचा लष्करप्रमुख या प्रकारची भाषा करू शकतो? पाकिस्तानी लष्कर व्यावसायिक नीतिमूल्य, संकेत यापासून किती दूर आहे, याचे हे उदाहरण. तेथे अल्पसंख्याकांना बव्हंशी संपविण्यात आले. तरीही लहान संख्येने का होईना, तो समुदाय आपल्या देशात आहे, हे मुनीर यांनी दुर्लक्षित केले. धर्म, रीतीरिवाज, संस्कृती, विचार या निकषांवर पाकिस्तान आणि भारत वेगळे आहेत आणि त्याच आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली आहे, असे ते म्हणाले. ज्या द्विराष्ट्रवादावर पाकिस्तानची निर्मिती झाली तो सिद्धांत विसरु नका, हे त्यांच्या म्हणण्याचे सार. पाकिस्तान ज्या ज्या वेळी संकटात असतो तेव्हा भारतविरोधी द्वेष शिखराला नेत युद्धजन्य स्थिती निर्माण केली जाते, हा आजवरचा अनुभव आहे. पाकिस्तानातील अस्थैर्य टोकाला पोहोचले आहे, हाच मुनीर यांच्या भाषणाचा अर्थ! बलुचिस्तानात पाकिस्तानी लष्कराविरुद्ध असलेली संतापाची भावना तीव्र झाली आहे. लष्कर, हेच तेथील बंडखोरांचे लक्ष्य आहे. जाफराबाद एक्स्प्रेसचे अपहरण असंतोष किती आहे याचे ठळक उदाहरण. पाणी पुरवठ्यात होणार्‍या भेदभावाबद्दल सिंधमध्ये राग उफाळून आला आहे. या समस्या हाताळून परिस्थिती शांत करण्याऐवजी बांगला देशात जिहादी मानसिकता कशी वाढेल, यात पाकिस्तानी लष्कर दंग झाले.‘पाकिस्तान’ हा देश म्हणण्याच्या योग्यतेचा भूप्रदेश नाही, मात्र त्या नावाच्या विचारसरणीने भारतीय उपखंडात कायम अस्थिरता ठेवली, ही वस्तुस्थिती. असीम मुनीर यांची विधाने पाकिस्तानला पुन्हा १९७१ च्या स्थितीकडे नेणारी ठरतील.
 
धर्माच्या नावाने फुत्कार
 
जोपर्यंत द्विराष्ट्रवादाचे भूत जिवंत ठेवता येईल, तोपर्यंतच पाकिस्तानचे अस्तित्व राहील, याची जाणीव तेथील शासकांना, अर्थात लष्कराला आहे. फुटीरतेची बीजे रोवून देश तोडणार्‍यांना आणि नवा, कृत्रिम देश निर्माण करणार्‍यांना नव्या देशातील नागरिकांना न्याय देता आला नाही. ‘आम्हाला लांडग्यांच्या तोंडी टाकण्यात आले’, या सरहद्द गांधींच्या विधानात पाकिस्तानच्या निर्मात्यांची योग्यता जोखली गेली आहे. फाळणीसाठी उतावीळ झालेले जे नव्या भूभागात गेले त्यांना मुहाजिर म्हणून दुय्यम वागणूक मिळाली. दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या या देशाचे एकमेव औचित्य म्हणजे लष्करासाठी निरंकुश राज्य करण्याचा परवाना! आधुनिक तंत्र विज्ञानाचे शिक्षण नव्या पिढ्यांना दिल्यास राज्य करण्याच्या आपल्या अधिकारावर गदा आणणारे ठरेल, आपल्याला शिक्षितांकडून जाब विचारला जाईल, ही पक्की जाणीव असल्यानेच धर्माचा गजर करण्यात तेथील राज्यकर्ते अग्रेसर राहिले. अन्य देशांत राजकीय नेतृत्व लोकांना जबाबदार असते, पाकिस्तानात ते लष्कराला जबाबदार आहे. आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी झुल्फिकार अली भुत्तोंसह अनेक कथित लोकनेत्यांनी वेळोवेळी लष्कराचीच तळी उचलून धरली. शेख मुजिबूर यांना पंतप्रधानपदापासून रोखून नवा देश निर्माण होणे आणि द्विराष्ट्रवादाच्या चिंधड्या उडविणे त्यांनी पसंत केले! द्विराष्ट्रवादाचा बुरखा फाटला तरी पाकिस्तान भावनावर आला नाही. ‘आमची मुळे भारतात नसून अरब देशात आहेत’, हे धडधडीत खोटे सांगत पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी देशाला भरकटत नेले. ती परंपरा पुढे नेत असीम मुनीर विद्वेष पसरवीत आहेत; पण यातून ना बलुची समुदाय सोबत येईल, ना व्याप्त काश्मीरमधील आक्रोश शांत होईल. पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेवरील प्रश्नचिन्ह यातून मिटणार नाही. धर्माच्या नावावर थोतांड माजविणार्‍यांमुळे पाकिस्तानच्या हाती भिकेचा कटोरा आला. तो कायम राहण्याचे काम मुनीर करतील, याबद्दल संदेह नको! 

Related Articles