तामिळनाडूमध्ये किफायतशीर दरात वेगवान इंटरनेटची घोषणा   

चेन्नई : तामिळनाडूमध्ये शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा राज्यमंत्री पलानिवेल थियागा राजन यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली. विभागाच्या अनुदानाच्या मागणीवरील सभागृहातील चर्चेत पलानिवेल थियागा राजन यांनी वेगवान इंटरनेट (१०० एमबीपीएस) अत्यंत किफायतशीर दराने २०० रुपये प्रति महिना घरांना प्रदान करण्याची योजना सर्वांसमोर मांडली.
 
५७,५०० किमी ऑप्टिकल फायबर टाकून १२,५२५ गावांना १ Gbps बँडविड्थने जोडण्याचे लक्ष्य आहे. ११,६३९ ग्रामपंचायती आधीच जोडलेल्या असून ९३% काम पूर्ण झाले आहे अशी माहिती राज्यमंत्री पलानिवेल थियागा राजन यांनी दिली. शैक्षणिक उद्देशांसाठी,सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे शैक्षणिक संसाधने आणि कार्यक्रम ऑनलाइन उपलब्ध होतील असा त्यांचा विश्वास आहे. मंत्री महोदयांनी ई-सेवा केंद्रांच्या वाढीचे कौतुक केले, ज्याची संख्या ७,००० वरून २८,००० पर्यंत वाढली आहे.
 
राज्य माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी असेही सांगितले केले की, राज्यातील चार हजाराहून अधिक पंचायतींनी आपापल्या गावांसाठी अर्ज केले आहेत. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरांमध्ये १०० एमबीपीएस वेगाचे वायफाय पुरवले जाईल. या उपक्रमामध्ये केबल टीव्ही ऑपरेटर्सप्रमाणेच फ्रँचायझी मॉडेल सादर करण्याची सरकारची योजना आहे.

Related Articles