दोन शेतकर्‍यांचा उष्माघाताने मृत्यू   

सातारा, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात उष्णतेची दाहकता वाढली असून, जावळी तालुक्यातील आर्डे येथील शेतकरी शेतात काम करताना उन्हाचा त्रास झाल्याने राजकुमार मारुती ससाणे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. माण तालुक्यातील भांडवलीतील ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय ७८, रा. तेलदरा) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात उन्हाच्या चटक्यांमुळे सारेचत्रस्त झाले आहेत.
 
याबाबतची माहिती अशी, की आर्डे येथील शेतकरी ससाणे काल सकाळी ११ वाजता आपल्या शेतात इतर शेतकर्‍यांसमवेत वैरण भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. त्यांना उन्हाचा त्रास झाल्यानंतर ते झाडाखाली येऊन बसले होते. पुन्हा बरे वाटले म्हणून ते परत काम करू लागले. ससाणे यांना यापूर्वी  कोणताही त्रास नव्हता. त्यांची तब्येत चांगली होती. मात्र, लगेचच पुन्हा ते चक्कर येऊन पडल्याने जवळच्या नागरिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आठच दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला होता. 
 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी आपला संसार उभा करून मुलांना चांगले शिक्षण दिले होते. गावामध्ये चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने आर्डे गावात शोककळा पसरली आहे.
 
कडक्याच्या उन्हामुळे त्यांना त्रास झाला. त्यांच्या निधनामुळे शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांना धास्ती बसली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शक्यतो उन्हात काम करताना काळजी घ्यावी.

- विकास वारागडे, उपसरपंच, आर्डे.

१२ दिवसांनी सापडला मृतदेह 

माण तालुक्यातीलतेलदरा (भांडवली) येथील बेपत्ता वृद्ध शेतकर्‍याचा मृतदेह बारा दिवसांनी सापडला असून, त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ज्योतिराम निवृत्ती शिंदे (वय ७८, रा. तेलदरा) हे घरातून बेपत्ता होते. घरातील सर्व जण त्यांचा शोध घेत होते. मात्र, तेकुठेही आढळून आले नाहीत. याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा योगेश शिंदे यानेदहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. २४ एप्रिल रोजी शोध घेताना सायंकाळी सहा वाजता योगेश याला त्यांच्याच मोगल दुती या शिवारात आंब्याच्या झाडाखाली वडील ज्योतिराम शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, तपास हवालदार रामचंद्र गाढवे करत आहेत.
 

Related Articles