संस्कारांची श्रृंखला बांधण्याचा प्रयत्न   

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे प्रतिपादन 

पुणे : समाजात सभोवताली पाहिले तर उद्याच्या पिढीची काळजी वाटावी असे वातावरण आहे. आई-वडिल नोकरी किंवा उद्योगानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. तर एका पिढी पासून दुसर्‍या पिढीपर्यंत संस्कारांची नाळ सांधणारे आजी आजोबा घरातून हद्दपार झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाद्वारे चार अद्भूत भावंडांची कथा मांडून संस्कारांची श्रृखंला बांधण्याचा एक प्रयत्न केला असल्याचे प्रांजळ मत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केले.
 
नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे ’संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या कलाकारांशी मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी लांजेकर बोलत होते. यावेळी मकरंद टिल्लू यांनी कलाकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तेजस बर्वे, नेहा नाईक, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे सहभागी झाले होते. यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे आणि कुसम काटे उपस्थित होते.
 
लांजेकर म्हणाले, शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रावर शक्तिचा संस्कार झाला आहे, तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रुपाने भक्तीचा संस्कार झाला आहे. समाजात प्रचंड प्रमाणात ताण आहे, हे समाजमन सुदृढ व्हावे म्हणून भक्तीचा संस्कार होणे आवश्यक आहे. हा चित्रपट बनविण्यामागे नव्या पिढीपर्यंत माऊली पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या चित्रपटाद्वारे निर्भीड मुक्ताई मांडण्याचा प्रयत्न केला असून मुक्ताई या पात्रा पासून प्रेरणा घेऊन भविष्यातील मुक्ताई तयार होतील अशी अपेक्षा आहे. 
 
स्मिता शेवाळे म्हणाल्या, यशोदाची भूमिका निभावणे हे माझ्यासाठी आव्हान होते, परंतू समस्त विश्वाला तारणार्‍या शक्तीने मलाही तारले आणि आदिशक्ती माऊलीनेच माझ्या कडून यशोदा हे पात्र करून घेतले. समीर धर्माधिकारी म्हणाले, मी मूळचा पैठणचा असल्याने आजीकडून लहानपणा पासून या चार अद्भूत भावांच्या कथा ऐकत आलो. या भावंडांतील आपआपसांतील संबंधाबाबत नेहमीच औत्सुक्य वाटत होते. अजय पूरकर, नेहा नाईक, तेजस बर्वे, अवधूत गांधी चित्रपटातील भूमिकाविषयी माह्तिी दिली.

Related Articles