महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रिकरण   

भूसंपादनासाठी स्वतंत्र समित्या 

पुणे: गंज पेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रिकरण आणि विस्तारीकरणासाठी सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी महापालिका आयुक्तांनी उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली दोन समित्या स्थापन केल्या आहेत. परंतू या दोन्ही समित्यांना विहित कालमर्यादेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असले तरी कालमर्यादा निश्चित केलेली नाही.
 
गंज पेठेतील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रिकरण आणि विस्तारीकरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी प्रत्यक्ष विस्तारीकरणासाठी सुमारे ५ हजार ३१० चौ.मी. तर रस्त्यासाठी २९८ चौ.मी. क्षेत्र संपादीत करायचे आहे. भूसंपादनाच्या जागेवर प्रत्यक्षात जुनी घरे असून जागा मालक आणि भाडेकरूंनाही भूसंपादनाचा मोबदला द्यावा लागणार आहे. मोबदल्यावरून नागरिकांमध्ये मतभेद असल्याने भूसंपदनामध्ये अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी मिळकतींचे सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष भूसंपादनासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत.
 
भूसंपादनासाठी परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये ११ स्थापत्य अभियंत्यांचा तर एक वरिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. तर सर्वेक्षणासाठी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किसन दगडखैर यांच्या नेतृत्वाखाली एक कनिष्ठ अभियंता, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील १५ टंकलेखक, कर आकारणी विभागाकडील सहा उपाधिक व निरीक्षक आणि घनकचरा विभागाकडील १२ निरीक्षक व अन्य कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
 
सर्वेक्षण समितीने प्रत्येक मिळकतीला भेट देऊन जागा मालक, भाडेकरू, क्षेत्र, मोबदल्याचे स्वरूप अशी विस्तृत माहिती घ्यायची आहे. संपादनासाठी नेमलेल्या समिती सदस्यांनी या मिळकतींना पुन्हा भेट देउन विस्थापित होणार्या नागरिकांच्या बैठका घेउन त्यांचे समुपदेशन करणे, माहिती संकलित झाल्यानंतर संपादनाबाबतचा प्रस्ताव तययार करून त्याला मान्यता घेणे आदी कामे विहीत कालमर्यादेत करायची आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.  

Related Articles