...अन् असा वाचला हिंदू प्राध्यापकाचा जीव   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना वेचून मारले. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी पर्यटकांना कलमा पठण करण्यास सांगत होते, जेणेकरून त्यांच्या धर्माची ओळख होईल. ज्यांनी कलमा पठण केले त्यांना दहशतवाद्यांनी जिवंत सोडले. यामध्ये एका हिंदू प्राध्यापकाचाही समावेश आहे. 
 
देबाशीष भट्टाचार्य असे दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ते आसाम विद्यापीठात बंगाली विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी जेव्हा दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरण खोर्‍यात हल्ला चढवला. त्यावेळी भट्टाचार्य आपल्या कुटुंबीयांसह तिथे होते. 
 
त्यावेळचा घटनाक्रम माध्यमांपुढे कथन करताना भट्टाचार्य म्हणाले, मी आपल्या कुटुंबीयांसमवेत एका झाडाखाली झोपलो होतो. तेव्हा माझ्या आजुबाजूचे लोक कलमा पठण करत असल्याचा आवाज आला. ते ऐकून मी सुद्धा कलमा पठण सुरू केले. काही वेळात एक दहशतवादी त्यांच्या दिशेने आला व माझ्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात त्याने गोळी मारली. त्यानंतर दहशतवाद्याने माझ्याकडे पाहिले व विचारले की, तू काय करत आहे? त्यानंतर मी मोठ्याने कलमा पठण करू लागलो. ते पाहून तो तेथून निघून गेला. त्यानंतर संधी साधत मी कुटुंबीयांना घेऊन तेथून बाहेर पडलो. घोड्यांच्या पाऊलखुणांच्या आधारे दोन तास पायपीट करत आम्ही कसेबसे जीव वाचवत हॉटेलवर सुखरुप पोहोचलो.
 

Related Articles