भारत दहशतवादापुढे झुकणार नाही : शहा   

नवी दिल्ली : भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादापुढे झुकणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. पहलगाममध्ये हल्ला करणार्‍यांना आणि पर्यटकांच्या हल्लेसाठी जबाबदार असलेल्यांना आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
 
पहलगाम हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री शहा तातडीने श्रीनगमध्ये दाखल झाले होते. काल शहा आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्याआधी, त्यांनी श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. 
 
तसेच, जखमींची भेट घेत विचारपूस केली. शहा यांना भेटताच मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी शहा यांच्याकडे, ’आम्हाला न्याय हवा आहे’, अशी मागणी केली. दरम्यान, शहा यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासमवेत होते.

एनआयएकडून तपास 

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणामार्फत (एनआयए) बुधवारी सुरू झाला. राजधानी दिल्ली आणि जम्मूमधील एनआयएच्या पथकांनी काल घटनास्थळास भेट देत पाहणी केली. 
 

Related Articles