डॉ. बाबा आढाव यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया होणार   

पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या मणक्यावर सिमेंटोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ. बाबा आढाव हे मागील सुमारे पाच वर्षांपासून मल्टिपल मायलोमा या एका सौम्य प्रकारच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. हा आजार आणि वाढत्या वयामुळे त्यांचे मणके ठिसूळ झाल्याने त्यांच्या मणक्यावर सिमेंटोप्लासी ही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या ते ९४ वर्षांचे आहेत.
 
मल्टिपल मायलोमा या एका सौम्य प्रकारच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ते मागील पाच वर्षांपासून गोळ्यांच्या स्वरुपातील केमोथेरपीने उपचार घेत आहेत. त्यांचा मल्टिपल मायलोमा हा आजार आजार आता नियंत्रणात आहे. त्यांचा उच्च रक्तदाबाचा आजारही पूर्णपणे आटोक्यात आहे. कर्करोगाच्या निदानानंतरही ते गेली ५ वर्षांपासून उपचाराच्या मदतीने अत्यंत सक्रिय राहिले आहेत.
 
सध्या डॉ. बाबा आढाव यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि कर्करोग तज्ज्ञ डॉ. विजय रमणन यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. पंरतु हा आजार आणि वाढते वय याच्या अपरिहार्य परिणामामुळे त्यांची हाडे, विशेषतः मणके ठिसूळ झाले आहेत. यामुळे त्यांना मोठ्या प्रमणात वेदना होऊ लागल्या आहेत. यामुळे त्यांच्या हालचालीवरही बंधने येत आहेत. यामुळे हाडाच्या ठिसूळपणासाठी त्यांना तातडीने औषधापचार सुरु करण्यात आले आहेत. मणक्याच्या ठिसूळपणासाठी त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सिमेंटोप्लास्टी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया जागेवर भूल देऊन करण्यात येणार आहे. ही छोटीच परंतु, अंत्यत आधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ करणार आहेत. यामुळे डॉ. बाबांच्या मणक्यांना बळकटी येवून, वेदना कमी होतील आणि त्यांच्या हालचाली पूर्ववत होतील, असा विश्वास अंगमेहनती, कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी व्यक्त केला.
 
या सर्व उपचाराच्या काळात जंतू संसर्ग टाळण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांचे सर्व अनुयायी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी रुग्णालयात आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी गर्दी न करता सहकार्य करावे, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि नितीन पवार यांनी केले आहे.
 

Related Articles