लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित   

वसंत व्याख्यानमालेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव 

पुणे : लोकमान्यांनी लोकांच्या मनात राष्ट्रभावना निर्माण करून त्याच लोकसंग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व केले. लोकमान्यांनी कर्मयोगाचे तत्वज्ञान स्वातंत्र्य चळवळीला दिले. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी हे द्वैत नाही, एका उत्क्रांती प्रक्रियेतील साखळीचे ते दोन भाग होत, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी सोमवारी येथे केले. 
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचे उद्घाटन डॉ. राजा दीक्षित यांच्या व्याख्यानाने टिळक स्मारक मंदिरात झाले. ‘लोकमान्यांचे योगदान : ऐतिहासिक मीमांसा’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते.  
 
डॉ. दीक्षित म्हणाले, लोकमान्यांचे अनेकांशी वैचारिक मतभेद असतील; मात्र, त्यांचे कोणाशी वैर नव्हते. उत्क्रांती प्रक्रियेतील साखळी आपण समजून घेतली पाहिजे. तरच, आपल्याला अभिनिवेश न ठेवता लोकमान्य आणि गांधी यांच्या इतिहासाकडे पाहता येईल. देशाच्या इतिहासाकडेही व्यापक दृष्टीने पाहता येईल.सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा तीन स्तरावर लोकमान्यांनी प्रभावी भूमिका बजावल्या. या तीनही स्तरावर त्यांनी लोकांच्या मनात देशप्रेम व स्वराज्याची भावना चेतविली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकमान्यांनी लोकसंग्रहाची व्याप्ती वाढविली.   
 
लोकमान्यांच्या या लोकसंग्रहाला दूरद़ृष्टी होती. म्हणूनच त्यांनी लोकसंग्रहाचे लोक चळवळीत रूपांतर केले. देशभक्तीने भारावलेला जनसागर एकवटल्यानंतर मात्र आपोअपच लोकमान्यांकडे राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाची जबाबदारी आली. लोकसंग्रहाची चळवळ दिवसेंदिवस वाढत गेल्याने स्वातंत्र्य चळवळीचे स्वरूपही वाढत गेले, असे प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. प्रारंभी लोकमान्य टिळक व न्यायमूर्ती रानडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या कार्यकारिणीचे सदस्य स्वप्निल पोरे यांनी सूत्रसंचालन केले.  वसंत व्याख्यानमाला २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. व्याख्यानमाला विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे. 
 
... तर लोकमान्यांना अभिप्रेत भारत अस्तित्वात येईल
 
समाजात मोठ्या प्रमाणात इतिहासाविषयी निरक्षरता आहे. इतिहासाच्या अंगाने आज विद्वेषी वातावरण निर्माण केले जात आहे. इतिहासाविषयीची किमान जाण आणि जाणीव सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण करू शकलो, तर लोकमान्यांना अभिप्रेत असणारा भारत अस्तित्त्वात येण्यास वेळ लागणार नाही. प्रतिभा असेल, तर इतिहासकार होता येते. अन्यथा, तो वृत्तलेखक बनतो.  इतिहासलेखन सृजनशील कृती आहे. इतिहास हा घडलेल्या घटनेत आणि लेखकाच्या दृष्टीत असतो. भूतकाळ आणि वर्तमान काळाचा संवाद म्हणजे इतिहास! इतिहासात चुकीच्या कल्पना रूजल्यास त्यातून गैरसमज निर्माण होतात. असे प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी स्पष्ट केले. 
 
वसंत व्याख्यानमाला एक चमत्कार
 
अध्यक्षीय मनोगतात डॉ. दीपक टिळक म्हणाले, वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘वसंत व्याख्यानामाला’ एक चमत्कारच आहे. सलग १५० वर्ष चालणारी ही एकमेव व्याख्यानमाला आहे. अशी व्याख्यानमाला देशात कोठेच अस्तित्त्वात नाही. तसेच, ऐकिवातही नाही. ही व्याख्यानमाला यंत्रयुग, संगणक आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तीन शतकांची साक्षीदार आहे. ज्या काळात संवाद माध्यमांचा अभाव होता, त्या काळात ही व्याख्यानमाला सुरू झाली. प्रदीर्घ काळानंतर संवादाची माध्यमे बदलली असून, आता माध्यमे खूप आहेत. ‘वसंत व्याख्यानमाले’ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने व्याख्यानमालेच्या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बदलते तंत्रज्ञान, विज्ञान, कृत्रिम बृद्धीमत्ता याविषयावरील चर्चा ग्रंथात मांडण्यात आली आहे. मी वसंत व्याख्यानमालेच्या तीन तपाचा साक्षीदार आहे, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले. 
 

Related Articles