मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..   

प्रत्यक्षदर्शीने सांगितला प्रसंग 

अहमदाबाद : विमान अपघातानंतर आम्ही मृतदेह बाहेर काढले. एका विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच होता, जेवण करत असताना त्याचा मृत्यू झाला होता, असा ह्रदयद्रावक प्रसंग एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितला.अहमदाबादमध्ये एक विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले. अपघातावेळी वसतिगृहात काय परिस्थिती होती, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने माहिती सांगितली. तो म्हणाला, विमान अपघाताच्या ४०  ४० सेकंद अगोदर मी वसतिगृहाच्या उपहारगृहातून बाहेर पडलो. नाहीतर माझादेखील त्यांच्यासोबत मृत्यू झाला असता. आतमध्ये सगळे विद्यार्थी जेवण करत होते. या दुर्घटनेनंतर मी लगेच माझ्या मित्रांना फोन केला. आम्ही सर्वांनी उपहारगृहात मदतकार्य राबवले. 
    
आम्ही सर्वात आधी गॅस सिलिंडर बाहेर काढले. कारण सिलिंडर आत असते तर अजून मोठा स्फोट झाला असता. त्यामुळे सिलिंडर बाहेर आणले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढले. एका मित्राच्या पायात काचा रुतल्या होत्या, तरीही त्याने त्याची पर्वा न करता विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहाच्या भितींखाली जेवता-जेवता ढिगार्‍याखाली अडकलेले विद्यार्थी होते. १० ते १५ जणांचे मृतदेह आम्ही हळूहळू बाहेर काढले. त्यामध्ये दोन आमचे मित्रच होते. एका मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचाही तसाच होता. बिचार्‍याला जेवता-जेवता मरण आले. 

Related Articles