दहावीच्या गुणपत्रिका येत्या सोमवारी मिळणार   

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी दुपारी ३ वाजता माध्यमिक शाळांमार्फत वितरित केल्या जाणार आहेत. तत्पुर्वी संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना दि. २६ मे रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
 
दहावीचा ऑनलाईन निकाल दि. १३ मे रोजी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला. सध्या इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा असून दहावीच्या गुणपत्रिकांच्या आधारे प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना असलेली गुणपत्रिकेची प्रतिक्षा आता संपली आहे. दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आवश्यक आहे.

Related Articles