अहिल्यानगरला वैद्यकीय महाविद्यालय व मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय   

चौंडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

अहिल्यानगर (चौंडी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी ५ हजार ५०३ कोटीच्या विकास आराखड्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मंगळवारी मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगरमध्ये ४३० खाटांचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व राहुरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या पदांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
राज्य मंत्रिमंडळाची ग्रामीण भागातील पहिलीच बैठक काल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण भागातील अनेक महत्वपूर्ण समस्यांबाबतचे निर्णय घेण्यात आले. त्याबाबतची सविस्तर माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे त्यासाठी ४८५ कोटी ८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. महाविद्यालय व रूग्णालयासाठी आवश्यक ती पदनिर्मिती करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या तलाव व घाटांच्या जतनासाठी विशेष योजना हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी ७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले. 
 
इतर मागास व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात येणार्‍या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी योजना तयार केली आली असून राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने कृतीत येणार्‍या या योजनेस मान्यता देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयात वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास मान्यता दिली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर येथे वसतिगृहे असतील. प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांची क्षमता असून मुले आणि मुलींचे प्रमाण समसमान राहील.
 
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान व पुरस्कार योजना सुरू करण्यास मंत्री परिषदेत मान्यता देण्यात आली. या योजनेद्वारे महिलांच्या आरोग्याबाबत समस्यांचे निराकरण करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे याचबरोबर लैगिंक अत्याचारास प्रतिबंध करणे हे या अभियानाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सिंहस्थ मेळाव्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रीपरिषदेने मान्यता दिली. ग्रामविकास विभागात सामाजिक परिवर्तन फाऊंडेनच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या मिशन महाग्राम कार्यक्रमाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन तसेच चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याचे व चोंडी येथील घाटाच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर या ठिकाणी भव्य अशा खास वातानुकूलित शामियान्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची जपणूक करण्यासाठी तसेच हा परिसर आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ व प्रेरणास्थान व्हावे, यासाठी मंत्रिमंडळाने ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली.
 
राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी विकास आराखडा तयार केला आहे.  पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांना मंजुरी दिली. यामध्ये सर्व अष्टविनायक तीर्थक्षेत्रांसाठी १४७ कोटी रुपये, तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर १ हजार ८६५ कोटी रुपये, श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर २५९ कोटी, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी रुपये, कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी १ हजार ४४५ कोटी, माहूरगड येथील श्रीक्षेत्रासाठी ८२९ कोटी यांचा समावेश आहे.
 
अहिल्यादेवी होळकर यांची कार्यपद्धती व त्यांचे जीवन पुढील सर्व पिढ्यांना माहीत व्हावे, यासाठी राज्य सरकारच्यावतीने देशातील अनेक भाषांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यात येणार आहे, 
 
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या महिलांसाठी आदिशक्ती पुरस्कार महिलांना देण्याची घोषणा करण्यात आली. धनगर समाजातील मुलांना इंग्रजीमधून शिक्षण घेता यावे यासाठी यशवंत विद्यार्थी योजना जाहीर केली आहे. दहा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पुणे व नागपूर येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्यापैकी  एक मुलींचे व एक मुलांचे असेल. 
 
अहिल्यादेवी होळकर यांनी गावोगावी असणारे घाट व पाणवठे यांचा विकास केला होता. त्याच धर्तीवर राज्य सरकारने चांदवड, त्र्यंबकेश्वर व मल्हार गौतमेश्वर जेजुरी येथील तलाव, १९ पुरातन  विहीरी, राज्यात सहा घाट, सहा कुंड, ३४ जलाशय यांचे पुनरुज्जीवन सरकार करणार असल्याची घोषणा करण्यात आली. उत्तरप्रदेशमधील प्रयागराज सारखाच नाशिक व त्रंबकेश्वर कुंभमेळा करण्याकरिता कुंभमेळा प्राधिकरण कायदा मंजूर केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला  शालेय अभ्यासक्रमामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचा समावेश करण्यात आला. 
 
बैठकीसाठी वातानुकूलित शामियाना 
 
• अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या शताब्दीच्यानिमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, संयोजक विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे  यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री व सचिव उपस्थित होत.
 
• नागपूर व छत्रपती संभाजीनगर यानंतर प्रथमच ग्रामीण भागामध्ये  मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामुळे  बैठकीची मोठी उत्सुकता संपूर्ण राज्यामध्ये होती. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमधून आयोजन करण्यात आले होते. बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली होती.  खास भव्य असा वातानुकूलित मंडप आणि विविध दालने निर्माण करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमांसाठी व सुरक्षिततेसाठी  मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यात भेट दिली. त्या ठिकाणी असणार्‍या महादेव मंदिरामध्ये जाऊन पूजन केले. त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची सर्वांनी पाहणी केली. रणरणत्या उन्हामध्ये सर्व मंत्री पांढरी टोपी घालून या सर्व परिसराची पाहणी करत होते.
 
दीडशे दिवसांचा कार्यक्रम 
 
• अहिल्यादेवी होळकर या उत्कृष्ट प्रशासन चालवणार्‍या म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होत्या. याच पार्श्वभूमीवर चोंडी येथे  मंत्रिमंडळाने राज्यातील विविध विभागांसाठी १५० दिवसांचा लोकाभिमुख कार्यक्रम जाहीर केला आहे. याची सुरुवात कालपासून झाली  असून ती २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला समाप्त होत आहे. यापूर्वीे सरकारने १०० दिवसांचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. ई गव्हर्नन्स संकल्पना तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार  आहे. या वेळी एकनाथ शिंदे यांनीदेखील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व निर्णयाला पाठिंबा असल्याचे सांगितले.
 
महायुती एकत्रित
 
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे लढणार आहे. या घोषणेमुळे महायुतीच्या घटक पक्षांमधील समन्वय आणि एकजुटीचे संकेत मिळाले आहेत. फडणवीस यांनी ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह आयोजित पत्रकार परिषदेत केली, ज्यामुळे या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून महायुतीच्या एकजुटीचा संदेश दिला.
 
मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
 
• अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या संस्थेसाठी लागणारे २७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बाह्ययंत्रनेद्वारे भरावयाच्या १२ अशा ३९ पदांना मान्यता देण्यात आली असून पदासाठी आवश्यक वेतनाकरिता दरवर्षी २३२.०१ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.

Related Articles