जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती   

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकणामुळे अडचणीत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. आता त्यांचे मेहुणे आणि खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचेही नाव चर्चेत आले आहे. चव्हाण यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
 
अंधारे म्हणाल्या, माहिती अधिकार कायद्यांतर्गत शशिकांत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांची माहिती मागितली. मात्र ती देण्यात आली नाही. वडील भरत चव्हाण यांच्या नावावर रावेतला जमीन करारनामा आहे. त्यात चव्हाण यांची पत्नी आणि वडील यांचे नाव आहे. रावेत परिसरामध्ये एलिगन्स नावाची मोठी स्कीम आहे, त्यातील कोट्यावधी रूपयांची सदनिका चव्हाण यांनी घेतलेली आहे. अनेक तालुक्यात शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्ता आहेत. इतकी मालमत्ता असेल तर चोंधेच्या सुनांच्या गुन्ह्यात लक्ष का देत नाही. ह्या लढाईत माझ्यावर दबाव तंत्र येऊ शकते, सर्व मालमत्ता ७०० ते ८०० कोटींची असण्याची शक्यता आहे.
 
सगळे लोक हे वैष्णवी हगवणे प्रकरणात कुठून ना कुठून एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. पोलीस निरीक्षकाकडे इतकी मालमत्ता येते ते गृहमंत्री यांनी पाहिले पाहिजे. पोलीस खात्यात आपले नातेवाईक आहेत, त्यामुळे काही होत नाही असे हगवणे कुटुंबाला वाटत होते. सगळ्यांची गृहमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे. शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे असताना जामिनावर असताना त्यांना पदोन्नती मिळते. यामध्येही गृहमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सुषमा अंधारें यांनी केली.अंधारे म्हणाल्या, शशिकांत चव्हाण यांचे सीडीआर पाहून यात वैष्णवी हगवणे प्रकरणात काही लिंक आहे का? ते तपासले पाहिजे. त्यांचा उत्पन्नाचे स्रोत काय आहे?, इतकी मोठी मालमत्ता कशी जमवली?, ते गरीब लोकांना न्याय देऊ शकतील का? असा प्रश्नदेखील यावेळी सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles