हवाई दलातील निवृत्त अधिकार्‍याची एक कोटीची फसवणूक   

सातारा, (वार्ताहर) : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत हवाई दलातील निवृत्त अधिकार्‍याला तब्बल एक कोटी १० लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. माधव मनोहर काळे (वय ६१, रा. शुक्रवार पेठ) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव प्रिसाळ (रा. करवडी) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
 
काळे हे हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची किशोर पिसाळ यांच्याशी ओळख झाली. पिसाळला सैन्यदलातून निवृत्त असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांची ओळख झाल्यानंतर काळे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची कल्पना पिसाळने सुचवली. त्यावेळी पिसाळने दीपक यादवशी काळे यांचा परिचय करून दिला. यादवनेही सैन्यदलातील निवृत्त असल्याचे सांगितले होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर प्रती महिना चार टक्केप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे यादवने काळे यांना सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून काळे यांनी एक कोटी १० लाखांची गुंतवणूक केली. त्यांनी यादव याच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले. काहीकाळ काळे यांना संशयितांनी परतावा केला. नंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने काळे यांना संशय आला. त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. मात्र, त्या वेळी संबंधित दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 
 
काळे यांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी संदेश चव्हाण (रा.मुंढे) यांची चार लाख आणि राजेंद्र पिसाळ (रा.करवडी) यांची एक लाख ९० हजारांची त्यांच्याकडूनच फसवणूक झाल्याची माहिती त्यांना समजली. आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय काळे यांना आहे. त्यानुसार त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली.

Related Articles