पहलगाम हल्ल्यानंतर बांगलादेशने ओकली गरळ   

ढाका : पाकिस्तानचे सैन्य बांगलादेशमधील जनतेवर अत्याचार करत असताना भारताने आपल्या सैन्याच्या मदतीने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. मात्र आता बांगलादेश चीनच्या जोरावर भारता विरोधातच गरळ ओकू लागला आहे. बांगलादेशच्या लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आणि सध्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय असलेल्या एएलएम फझलूर रहमान यांनी भारताविरोधात विधान केले आहे. ‘भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्ये ताब्यात घ्यावीत’, असे विधान त्यांनी केले.
 
निवृत्त लष्करी अधिकारी एएलएम फजलूर रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सदर विधान केले. बांगलादेशने आतापासूनच चीनशी संयुक्त लष्करी कारवाईबाबत संवाद सुरू करावा, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.“भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्य भारतातील सर्व सात राज्य ताब्यात घ्यावीत. या विषया संदर्भात चीनबरोबर संयुक्त लष्करी कारवाई करण्यासाठी आतापासूनच चर्चा सुरू करावी, असे मला वाटते”, अशा आशयाची एक पोस्ट रहमान यांनी फेसबुकवर लिहिली आहे. एएलएम फजलूर रहमान हे २००९ साली घडलेल्या बांगलादेश रायफल्स (बीडीआर) हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय स्वतंत्र चौकशी आयोगाचेही अध्यक्ष आहेत.
 
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर बांगलादेशचे हे विधान समोर आले आहे. मात्र बांगलादेशच्या अंतरिम सरकारने फजलूर रहमान यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयातील प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले की, फजलूर रहमान यांनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे.
 
शफीकुल आलम पुढे म्हणाले, “अंतरिम सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर व्यक्त करत नाही आणि रहमान यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. बांगलादेश सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा आदर करतो. तसेच इतरांकडूनही याचप्रकारची अपेक्षा ठेवतो. मेजर जनरल फजलूर रहमान यांनी केलेली टिप्पणी वैयक्तिक असून त्यात बांगलादेश सरकारला ओढू नका, असे आवाहन आम्ही करत आहोत.”

Related Articles