स्वतंत्र सिंधुदेशासाठी पाकिस्तानात आंदोलन   

इस्लामाबाद : भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्वतंत्र सिंधुदेशाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या संधीचा फायदा उठवून पाकिस्तानपासून वेगळे व्हावे आणि सिंधुदेश निर्माण करावा, यासाठी आंदोलनाला प्रारंभ झाला आहे.
 
सिंधी नागरिकांसाठी स्वतंत्र मातृभूमीची निर्मिती व्हावी. भेदभावाला विरोध आणि पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी निदर्शने केली जात आहेत. अनेक संघटनांनी सिंधुदेशच्या स्थापनेची मागणी सुरू केली. त्यात  सिंधुदेश लिबरेशन आर्मी, जय सिंध कौमी महाझ, जय सिंध मुत्ताहिदा महाझ, जय सिंध स्टुडंट्स फेडरेशन या सारख्या संघटना वेगळ्या सिंधुदेशची मागणी करत आहेत.
 
पाकिस्तानी पंजाबी नागरिकांनी अन्य नागरिकांकडे दुर्लक्ष केले आहे.  बलुचिस्तानमधील बलुच, सिंध प्रांतातील सिंधी आणि आदिवासी भागातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक आणि आर्थिक स्तरावर प्रगती होण्यापासून त्यांना रोखले जात आहे. सरकारी महसुलातील सर्वात मोठा वाटा पंजाबमध्ये खर्च केला जातो, तर उर्वरित देशातून महसूल गोळा केला जातो. पण, सिंध, बलुचिस्तान आणि आदिवासींच्या वाट्याला त्याचा हिस्सा येत नाही. सिंधुदेश चळवळ १९५० च्या दशकात वादग्रस्त ’वन युनिट प्लॅन’ अंतर्गत पाकिस्तानच्या राजकारणाच्या केंद्रीकरणासह सुरू झाली, ज्यामध्ये सिंध, बलुचिस्तान, पाकिस्तान पंजाब आणि उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांत यांना १९५५ मध्ये पश्चिम पाकिस्तानचे ’सिंगल युनिट’ घोषित करण्यात आले आणि पूर्व पाकिस्तान (पूर्व बंगाल) एक स्वतंत्र युनिट बनवण्यात आले होते. 

लष्कर करेल अनेक तुकडे

पाकिस्तानी सैन्य  पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच बांगलादेशात १९७० पूर्वी  अत्याचार करत होते, त्या वेळी पाकिस्तानी सैन्य सिंध भागात आक्रमक कारवाया करत होते. तेव्हापासून सिंधमध्ये स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी सुरू झाली होती. तेव्हा पंजाबी मुस्लिमांनी सिंध प्रांतावर पूर्ण ताबा मिळवला होता. पाकिस्तानच्या निर्मितीबरोबरच सिंध हा देश निर्माण करण्याची मागणी तेव्हापासून सुरू आहे. पंजाबी मुस्लिमांनी सिंधमध्ये उर्दू लादली. त्यामुळे सिंधमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. अजूनही त्या अन्यायाची खदखद सिंधी नागरिकांमध्ये आहे.  
 

Related Articles