काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद   

सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोर्‍यातील ५० सार्वजनिक उद्याने पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.  ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख आहे, अशी ठिकाणी खुली राहतील, असे सरकारने म्हटले आहे.काश्मीरमध्ये ८७ पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. त्यापैकी, ४८ पर्यटने केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहेत. यामध्ये मागील दहा वर्षांत नव्याने सुरू झालेल्या काही पर्यटक केंद्रांचा समावेश आहे.
 
पर्यटनासाठी बंद करण्यात आलेल्या पर्यटन केंद्रे बांदीपोरा, बडगाम, कुलगाम, कुपवाडा, हंदवाडा, सोपोर, अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर जिल्ह्यातील आहेत.पहलगामच्या बैसरण परिसरात २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झला होता. यामध्ये एक परदेशी पर्यटक आणि दोन स्थानिकांचा समावेश होता. तर, अन्य २३ जण विविध राज्यांतून पर्यटनासाठी आले होते. दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारुन गोळीबार केला होता. 
 
या हल्ल्याची भीषण छायाचित्रे आणि चित्रफिती समोर येत आहेत. त्यातून हल्ल्याची दाहकता स्पष्ट होत आहे. या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) केला जात आहे. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदविला गेला आहे. यासोबतच, अनेकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे.दहशतवाद्यांची तीन रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. चार हल्लेखोरांनी हा नरसंहार घडविला असल्याचे समोर आले आहे. नरसंहारानंतर जंगलात पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. हेलिकॉप्टर, ड्रोन, श्वान पथकाचीदेखील यासाठी मदत घेतली जात आहे.
 

Related Articles