शिकाऊ डॉक्टरची गळा चिरून आत्महत्या   

सोलापूर, (प्रतिनिधी) : प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात पुन्हा एका डॉक्टराने आत्महत्या केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामधील एका शिकाऊ डॉक्टराने होटगी रोडवरील फ्लॅटमध्ये गळा चिरून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबियार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव असून, तो मुंबईचा रहिवासी आहे.
 
होटगीरोडवर भीमा कालवा मंडळ कार्यालयाच्या बाजूला असलेल्या वसाहतीमधील एका पॅराडाईज अपार्टमेंटमधील फ्लॅट त्याने भाड्याने घेतला होता. या ठिकाणी तो एकटाच राहत होता. हात व गळा चिरून या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. मृत डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याच्या शेजारी कात्री दिसत होती. सन २०१९ च्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. या डॉक्टराने अशा पद्धतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागात नेण्यात आला आहे. वसतीगृहातील इतर डॉक्टरांची सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली होती. विजापूरनाका पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले.
 

Related Articles