विमानतळावर बिबट्याचे दर्शन   

पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळ परिसरात सोमवारी दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाले. विमानतळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरापर्यंत बिबट्या आला होता. एकदा धावपट्टीजवळ तर दुसर्‍यांदा विमाने उभ्या असलेल्या ठिकाणी बिबट्या दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विमानतळ प्रशासनाने वन विभागाला याची माहिती देण्यात आली. दिवसभरात दोन वेळा बिबट्या दिसल्याचे व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे.  
 
सोमवारी सकाळी ७ वाजता पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर रात्री ८ वाजता पुन्हा बिबट्या विमानतळ परिसरात आढळून आला. विमानतळाच्या एअरसाईडजवळ बिबट्या दिसला. हे क्षेत्र प्रतिबंधित आहे कारण इथे विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होते. वन विभागाचे अधिकारी सुरेश वरक यांनी सोमवारी रात्री उशिरा याबद्दल माहिती दिली. ’सकाळी ७ वाजता आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास तो दिसला. रात्री तो धावपट्टीपासून ५०० मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून ८०० मीटर अंतरावर होता. आम्ही विमानतळ परिसरात त्याचा शोध घेत आहोत. त्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही बसवण्यात आला आहे, वरक यांनी सागितले होते. विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर बिबट्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
 

Related Articles