वाचक लिहितात   

हे व्यापार युद्ध कुणाच्या हिताचे?

अमेरिका फर्स्ट यासाठी खास धोरण आखून जगातील इतर देशांच्या आयात निर्यातीवर मोठे कर लागू केले. प्रथम अमेरिकेने चीनवर १४५ टक्के कर आकारण्यास सुरुवात केल्यावर चीनने १२५ टक्के दरांनी कर लावून आपण पण काही कमी नाही, अशा थाटात जशास तसे या प्रतिक्रियेने अमेरिकेला उत्तर दिले. चीनने संरक्षण क्षेत्रांत वापरल्या जाणार्‍या घटक वस्तूंची निर्यात बंद केली. त्यापुढे जात अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर २४५ टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. अमेरिकेला विदेशी स्रोतांवर अवलंबून रहावे लागणे हे आर्थिक समृद्धी आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीवर परिणामकारक ठरू शकते, हा त्यामागचा उद्देश. या करवाढीमुळे चीनवर वचक निर्माण करणे शक्य होईल असे अमेरिकेला वाटते; परंतु या दोन देशांमधील वादात फक्त व्यापारावर परिणाम न होता जागतिक पातळीवरील राजकारण, सुरक्षा व्यवस्था, तंत्रज्ञान या सर्वांवर जशास तसे तंत्र वापरून चालणार नाही, तर त्यासाठी बाधक राष्ट्रांनी एकत्रितपणे काही ना काही तडजोडी स्वीकारत शांततेने पर्याय काढण्याची गरज आहे व यावर एकमत व्हावे या अपेक्षा आहेत, अन्यथा जागतिक पातळीवर सर्व प्रकारच्या बाजारांवर अस्थैर्य, अनिश्चितता यांचे वातावरण पसरून जगभराच्या ग्राहकांना महागाई, वस्तूंची अनुपलब्धता यांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल.

स्नेहा राज, गोरेगांव.

कर्मचारी वेतनाविना

केईएमचे कर्मचारी दोन महिने वेतनाविना, हे वृत्त वाचून आश्चर्य वाटले. मध्यंतरी एसटी कर्मचार्‍यांना निम्माच पगार देण्यात आला होता. कर्मचार्‍यांनी या प्रकरणी हल्लाबोल केल्यावर मग दोन दिवसात त्यांचा उर्वरीत पगार देण्यात आला. एसटी असो अथवा रुग्णालय असो, यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश होतो. त्यामुळे या दोघांनीही त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध, संपाचे अस्त्र उपसल्यावर त्यात त्यांची काहीच चूक नाही, तसेच जनतेची गैरसोय झाल्यास याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. एसटी कर्मचारी अथवा रुग्णालयातील कर्मचारी पगाराविना उपाशी राहात आहेत, हे संतापजनक आहे.     

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई

महाराष्ट्राचा बहुमान

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या त्यांना पुढील महिन्यात १४ तारखेला सरन्यायाधीशपदाची शपथ देतील, त्यावेळी इतिहास रचला जाईल. न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे महाराष्ट्राचा बहुमान होय, कारण ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अमरावतीत त्यांचा जन्म झाला असून छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

ही सर्जनशीलता की विकृती?

नवी मुंबईत अलीकडेच काही तरुणांनी एका चालत्या गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकवत मृतदेह असल्याचा बनाव केला आणि त्याचा व्हिडिओ एका जागरुक नागरिकामुळे समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. हा प्रकार पाहून अनेक नागरिक घाबरले, पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आणि अखेर हे केवळ प्रसिद्धीसाठीचे नाटक असल्याचे उघड झाले. लॅपटॉपच्या जाहिरातीचा एक भाग म्हणून ते कृत्य त्या तरुणांनी केले. याला केवळ एक खोडसाळपणा म्हणता येईल का? समाजात भीती पसरवणे, पोलिस यंत्रणेचा वेळ आणि संसाधने वाया घालवणे आणि मृत्यूसारख्या गंभीर विषयाचा उपहास करणे या सगळ्याला फक्त ’मनोरंजन’ म्हणावे का? ही कुठली सर्जनशीलता? या प्रकाराला विकृतीच म्हणावे लागेल.

दीपक गुंडये, वरळी.

सायबर गुन्हेगारीत अडकू नका

संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा सर्वात मोठा फटका, ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. ज्येष्ठ नागरिक चटकन कोणाच्याही गोड गप्पात येतात, भुरळ घालणार्‍या गप्पात येतात व या गुन्हेगारीत अडकून मोठे आर्थिक नुकसान करवून घेत आहेत. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक लाभाच्या, आपल्या आयुष्याची पूर्ण पुंजी आर्थिक लाभ मिळेल या हेतूने या गुन्हेगारीत अडकत आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना मोबाइल किंवा इतर तांत्रिक गोष्टींचे पुरेपूर ज्ञान नसते. फक्त कामापुरते ज्ञान व माहिती असते. कुणाचाही मोबाइल फोन येवो हे त्या गोड बोलणार्‍या बाहेरील व्यक्तीला ते आपल्या आर्थिक व्यवहाराची व इतरही माहिती देऊन टाकतात आणि जेव्हा फसवेगिरी उघड होते तेव्हा ते पश्चाताप करीत बसतात; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. व्यक्तींच्या विसर भोळेपणाचा, त्यांच्या भावनात्मकतेचा फायदा हे सायबर गुन्हेगार उचलत आहेत. सरकार मोबाईलवर, पोलिसांद्वारे, वारंवार देशातील नागरिकांना सावध करीत आहे; पण लक्षात कोण घेतो? पोलीस खात्यानेही निराधार, निराश्रित व पेन्शनरसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर घेऊन या सायबर गुन्हेगारीबाबत सतर्क करावे. बँकांनीही खातेदारांना या सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्यासाठी खातेदारांची महिन्यातून एक दिवस बैठक घेऊन या सायबर गुन्हेगारीबाबत सावध करावे, तरच या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा बसेल.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

 

Related Articles