नौदलाचे सामर्थ्य वाढणार   

भारत-फ्रान्समध्ये राफेल खरेदीबाबत करार

नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्समध्ये सोमवारी ६४ हजार कोटींच्या २६ राफेल सागरी लढाऊ विमान खरेदीबाबतचा करार झाला. या करारामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लवकरच मोठी भर पडणार आहे.या करारावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. ‘द सॉल्ट एव्हिएशन’ या फ्रान्सच्या नामांकित कंपनीकडून भारत राफेल खरेदी करत आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) नुकतीच आयएनएस विक्रांतवर तैनातीसाठी ६४ हजार कोटींच्या राफेल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.या करारानुसार, फ्रान्स २०३० पासून भारतीय नौदलात राफेल सागरी लढाऊ विमान दाखल होण्यास सुरूवात होईल. जुलै २०२३ मध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात प्राथमिक मान्यता दिली होती.
 
या करारांतर्गत भारतीय नौदलाला एक पायलट असलेली २२ विमाने आणि दोन सीट असलेली चार अशी २६ अत्याधुनिक राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. या करारांतर्गत केवळ विमानेच नव्हे, तर त्यांना लागणारी शस्त्रे आणि सुट्या भागांसह संबंधित सहायक उपकरणे देखील मिळणार आहेत.
 
या करारामुळे भारताच्या नौदल आणि वायुदलाची क्षमता प्रचंड वाढणार असून, चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांवर सामरिक दबाव वाढवण्यास भारताला मदत होणार आहे. हा करार केवळ संरक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर भारताच्या जागतिक सामरिक शक्तीला एक नवीन ओळख देणारा ठरणार आहे.
 
भारतीय हवाई दलाला २०१६ मध्ये केलेल्या ५९ हजार कोटींच्या करारानुसार ३६ राफेल लढाऊ विमाने देण्यात येत आहेत. काही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आली आहेत. भारतीय नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची मिग २९ के ही ४० विमाने आहेत. २००९ मध्ये नौदलाला ४५ विमाने मिळाली होती. त्यापैकी पाच अपघातग्रस्त झालेली आहेत.
 

Related Articles