‘आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल...’   

शवपेटीला मिठी मारून पत्नी हिमांशी यांनी दिला अखेरचा निरोप 

करनाल : भारतीय नौसेनेचे २६ वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल हे देखील जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मारले गेले आहेत. नरवाल यांचे ६ एप्रिलला लग्न झाले होते. ते आपल्या पत्नीसमवेत मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले होते.
 
नरवाल हे मूळचे हरयानाच्या करनाल जिल्ह्यातील भुसली गावचे रहिवाशी होते.  बी. टेक. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दोन वर्षांपूर्वी भारतीय नौसेनेत सामील झाले होते. नरवाल हे सध्या कोचीमध्ये लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. ६ एप्रिलला त्यांचे लग्न झाले होते. १९ एप्रिलला त्यांचे रिसेप्शन झाले होते. त्यानंतर ते मधुचंद्रासाठी स्वित्झर्लंडला जाऊ इच्छित होते. मात्र, त्यांना व्हिसा मिळाला नाही. म्हणून ते २१ एप्रिलला काश्मीरला गेले होते. मात्र, या दहशतवादी हल्ल्याने त्यांचा आनंदचा हिरावला. गोळीबारात विनय याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्याच्या ठिकाणाहून विनयची पत्नी हिमांशीचा एक फोटो जगभर  प्रसारित होत आहे, त्यामध्ये ती दरीत विनयच्या मृतदेहाजवळ स्तब्ध बसलेली आहे.

शवपेटीला मिठी मारून पत्नीचा आक्रोश  

दिल्ली विमानतळावर हिमांशी यांनी पती लेफ्टनंट विनय यांना अखेरचा निरोप दिला. तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. तिची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या मृतदेहाला मिठी मारून रडताना दिसत आहे. ‘तुमच्यामुळेच आज अनेक लोक जिवंत आहेत आणि आम्हाला तुमचा सदैव अभिमान असेल’. असे म्हणत हिमाशी बेशुद्ध झाली, त्यानंतर कुटुंबीयांनी तिचे सांत्वन केले.  
 

Related Articles