महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन   

मुंबई : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केला आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा  समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीने हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे.
 
शांत स्वभावासह क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम रणनितीकार अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९ फलंदाजांची शिकार करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. फलंदाजीसह विकेट किपिंगमधील खास कामगिरीसह त्याने क्रिकेट वर्तुळात आपला खास ठसा उमटवला. मोठ्या फटकेबाजीसह त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद तर दाखवलीच. याशिवाय   मिली सेकंदात स्टंपिंगसह अफलातून कॅचसह त्याने विकेटमागेही धोनी मॅजिक दाखवून दिले आहे. 

Related Articles