डॉ. अजय तावरे याला अटक   

किडनी रॅकेट प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. अजय तावरे याला पोलिसांनी रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  किडनी रॅकेट प्रकरणात ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यास चौकशीनंतर अटक करुन, न्यायालयासमोर उभे करण्यात आले, असे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.
 
२०२२ मध्ये डॉ. अजय तावरे हा रूबी हॉल क्लिनिकमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाला मान्यता देणार्‍या प्रादेशिक अधिकृतता समितीचा प्रमुख होता. मार्च २०२२ मध्ये किडनी रॅकेट प्रकरण घडले. त्यानंतर, मे २०२२ मध्ये पोलिसांनी रूबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कर्मचार्‍यांसह १५ जणांविरूध्द गैरव्यवहाराच्या आरोपानंतर गुन्हा दाखल केला. 
 
कोल्हापूरमधील एका महिलेला एका पुरूष किडनी प्राप्तकर्त्याची पत्नी म्हणून खोटे बोलण्यासाठी १५ लाख देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याने एका तरूणीला त्याची किडनी दान केली. तर तरूणीच्या आईने तिची किडनी त्या पुरूषाला दान केली.  हे बेकायदेशीर जोडी अवयव हस्तांतरण होते. पैशांवरून झालेल्या वादानंतर महिलेने तिची खरी ओळख उघडकीस आणली. काही दिवसांनी ही फसवणूक उघडकीस आली. या किडनी रॅकेटमध्ये डॉ. तावरे याची भूमिकाही संशयास्पद आढळली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. तावरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. काल अटक केल्यानंतर त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली.

Related Articles