‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेसाठी विरोधक आक्रमक   

सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’सह अन्य मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत सोमवारी विरोधक संसदेत आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा काल पहिला दिवस होता. लोकसभा आणि राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ चर्चा करण्यात यावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानातील लष्करी संघर्ष आपल्या मध्यस्थीनंतर थांबला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. त्यावर, पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात केली. याचप्रमाणे लोकसभेतही विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेची मागणी केली. तसेच, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्यापी फरारी आहेत, असेही ते म्हणाले.
 
खर्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले, सरकारला कोणतीही चर्चा टाळायची नाही. देशात असा संदेश जाऊ नये की सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा टाळत आहे. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील सर्व टप्प्यांची माहिती संसदेत मांडली जाईल.
 
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तर कालावधीनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा घेतली जाईल. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही, असे सांगितले. यानंतरही, विरोधक मागणीवर कायम राहिले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकार सर्व मुद्द्यांवर नियमाप्रमाणे चर्चा करण्यास तयार आहे, असे सांगितले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील सरकार चर्चेस तयार असल्याचे सांगितले. पण, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तातडीने चर्चा घेण्याची मागणी लावून धरली. प्रारंभी अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, कामाकाजास सुरुवात झाली. पण, सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले.
 

Related Articles