समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार   

मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरील वेगमर्यादा, लेन शिस्त आणि इतर १७ प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विठ्ठल लंघे यांनीही सहभाग घेतला.
 
या लक्षवेधीच्या उत्तरात भुसे यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी महामार्गावर अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद २१ वाहने, २१ रुग्णवाहिका, १६ गस्त वाहने,  महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्र १६ आणि ३० टन क्षमतेच्या १६ क्रेन यासह महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १७२ सुरक्षा रक्षक अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, २१ रुग्णवाहिका १०८ (आपत्कालीन वैद्यकीय सेवा महाराष्ट्र राज्य) शी जोडलेल्या आहेत.या व्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका (१०८) अहिल्यानगर जिल्ह्यात ४०,  अमरावती  ३१,  छत्रपती संभाजीनगर ३१, बुलढाणा  २३,  जालना १५, नागपूर ४०, नाशिक ४६, ठाणे ३९, वर्धा ११, वाशिममध्ये ११ अशा २८७ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात, असेही भुसे यांनी सांगितले.भुसे पुढे म्हणाले, या अपघाताची माहिती कंट्रोल रूमला मिळताच तत्काळ मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले. 

Related Articles