नवी दिल्ली : दिव्यांग जवान पेन्शनसाठी पात्र असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायलयाने शनिवारी दिला. सशस्त्र दलाच्या लवादाने जवानांना पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. त्या विरोधात संरक्षण मंत्रालयाने सुमारे २०० आव्हान अर्ज दाखल केले होते. ते सर्व अर्ज न्यायालयाने काल रद्द करुन दिव्यांग जवान पेन्शनसाठी पात्र असल्याचा निकाल दिला आहे. शांततेच्या काळात कार्यरत असताना किंवा आजारामुळे जवान दिव्यांग झाले तर त्यांची पेन्शन रोखता येणार नाही, लष्कराच्यात सेवेत विविध कारणांमुळे जवानांना अनेकदा तणावाला देखील सामोरे जावे लागते, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. न्यायाधीश नवीन चावला आणि शैलेंद्र कौर यांनी सागितले की, दिव्यांग जवानांना पेन्शन देणे ही त्यांच्यावर दाखवण्यात येणारी दया नाही. देशाच्या संरक्षणासाठी ते सर्वोच्च बलिदान देत असतात. प्रतिकूल परिस्थितीत ते दिव्यांग झाले तरी ते पेन्शनसाठी पात्र आहेत. या संदर्भातील आदेश १ जुलै रोजी न्यायालयाने दिला असून तो ८५ पानांचा आहे. भारतीय सशस्त्र दलाने दिव्यांग जवानांना आवश्यक आर्थिैक पाठिंबा द्यावा. तसेच ते पूर्ण बरे व्हावेत, यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत, असेही आदेशात नमूद केले. गंभीर जखमांमुळे अनेकदा जवानांना सामान्य व्यक्तीप्रमाणे हालचाल करता येत नाही. अशा दिव्यांग जवानांना पेन्शन दिल्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षा मिळण्याबरोबरच प्रतिष्ठा देखील प्राप्त होणार आहे. देशभक्तीने ते प्रेरीत असतात. प्राणाची बाजी लावून ते देशसेवा करत असतात. त्यामुळे अशा जवानांना पेन्शन देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे, असेही आदेशात नमूद केले.
Fans
Followers