आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी   

उद्धव यांचा मनसेसोबत राजकीय युतीसाठी पुढाकार

मुंबई, (प्रतिनिधी) : हिंदीसक्ती बाबत सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर शनिवारच्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. यानिमित्ताने मराठीचा एल्गार आणि उद्धव-राज यांच्यातील मनोमिलन संपूर्ण राज्याने पाहिले. 
 
यावेळी उद्धव यांनी एकत्र आलो, ते एकत्र राहण्यासाठी, असे सांगत पुढील काळात एकमेकाच्या सोबत राजकारण करण्याचे संकेत दिले. संकट आले की, मराठी म्हणून आपण एकवटतो आणि संकट गेले की एकमेकांशी भांडतो. पण, आता असा नतदृष्टपणा अजिबात करायचा नाही. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, असे आवाहन उद्धव यांनी केले. कुणावर अन्याय करू नका. पण, तुमच्या अंगावर कुणी हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
 
मराठी एकजुटीचा विजयी मेळावा वरळी डोम येथे काल पार पडला. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न लावता केवळ मराठीचा अजेंडा ठेवून झालेल्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, काँगे्रसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, रासपचे महादेव जानकर, सीपीएमचे प्रकाश रेड्डी, शेतकरी नेते अजित नवले, माकपचे विनोद निकोले, दिपक पवार, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आदींबरोबरच शिवसेना-मनसेचे वरिष्ठ नेतेमंडळी आणि मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
विजयी मेळाव्यात केवळ उद्धव आणि राज हे दोघेच व्यासपीठावर होते व या दोघांचीच भाषणे झाली.यावेळी उद्धव यांनी मराठी भाषेच्या मुद्यावर एकजूट दाखविणार्‍या सर्वांना धन्यवाद दिले. बर्‍याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली. आम्ही एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी, असे ठणकावून सांगतानाच उद्धव यांनी तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्रात आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
 
भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? १९९२-९३ मध्ये जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवले. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असे फडणवीस सांगत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर आणि त्याला तु्म्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू, असेही उद्धव यांनी ठणकावले.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मराठी माणसांनी लढून हक्काची मुंबई मिळवली. तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी मुंबई मराठी माणसांना देण्यास तयार नव्हते. आज ते मराठी असल्याचा दावा करतात. पण, ते केवळ नावाने मराठी आहेत. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे आता तपासावे लागेल. स.का. पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत? झुकवल, वाकवल, गुडघ्यावर आणले आणि मराठी माणसाने आपल्या हक्काची मुंबई मिळवली. आता तुमच्या ७ पिढ्या आल्या तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती चालणार नाही म्हणजे नाही. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. त्याचा मला अभिमान आहे. मागील विधानसभेत त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ केले. महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवले आणि मराठेतरांना एकत्र करून सत्ता प्राप्त केली. मराठी माणूस आपसात भांडले आणि दिल्लीचे गुलाम आज आपल्यावर राज्य करायला लागले, असल्याची टीका उद्धव यांनी केली.
 
मंत्रालयात तुमची सत्ता असली तरी रस्त्यावर आमचीच सत्ता : राज ठाकरे 
 
हिंदीसक्ती म्हणजे खडा टाकून अंदाज घेण्याचा प्रयत्न होता. मुंबई स्वतंत्र करता येते का? हे पाहण्यासाठीच सत्ताधार्‍यांनी आधी मराठी भाषेला डिवचून पाहिले. हिंदीसक्ती लादण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढचे पाऊल टाकू, असा ह्यांचा डाव होता. आम्ही शांत आहोत, म्हणजे प्रतिकार करणार नाही, असा याचा अर्थ नव्हे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सरकारला दिला. 
 
मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाबत कधीही तडजोड करणार नाही.  कुणीही यावे आणि सत्ता आहे म्हणून कसलीही सक्ती करावी, हे चालणार नाही. लक्षात ठेवा तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानसभेत, पण आमच्याकडे रस्त्यावरची सत्ता आहे.  माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे कुणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती.  
 
त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडून आल्याचा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला.मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सत्ताधार्‍यांना हिंदीसक्तीचा निर्णय रद्द करावा लागला. देशातील हिंदी भाषिक राज्ये मागास असून गैरहिंदी राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रगत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिंदीभाषिक राज्यातून लोक इकडे येतात. दक्षिणेतील राज्यामध्ये हिंदी सक्ती करून दाखवाल का? असा सवालही राज यांनी केला. केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी सक्ती नाही. न्यायालयातही इंग्रजी भाषेमध्ये कारभार चालतो. मग, महाराष्ट्रातच त्रिभाषा सुत्राचा प्रयोग का करता? असा सवालही त्यांनी केला. मात्र, आता महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होते हे सत्ताधार्‍यांना कळले असेल. त्याशिवाय काय त्यांनी माघार घेतली, असेही राज म्हणाले.
 
मराठ्यांनी कधी मराठी लादली नाही
 
मराठ्यांनी हिंद प्रांतावर तब्बल १२५ वर्षे राज्य केले. मात्र, त्या ठिकाणी मराठ्यांनी मराठी लादली नाही. गुजरात, राजस्तान, पंजाबमध्येही मराठे पोहोचले होते. शिवाय, हिंदी भाषा महाराजांच्या काळातही नव्हती. मग, आताच हिंदी सक्तीचा अट्टाहास का? असा सवालही राज  यांनी केला. अमित शहा काही दिवसांपूर्वी म्हणाले की, इंग्रजी बोलता येते याची पुढे आपल्याला लाज वाटेल. यावर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर आम्ही काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
 
फडणवीसांनी करून दाखवले 
 
• कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे मी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानुसार उद्धव आणि मी २० वर्षांनंतर एकत्र आलो. आम्हाला एकत्र आणणे जे अनेकांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असा टोलाही राज यांनी लगावला.
 
विजय मेळाव्यात राजकारणाचे रडगाणे
 
विजय मेळाव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू यांच्या मनोमिलनाचे श्रेय दिल्याबद्दल त्यांचे उपरोधिक आभार व्यक्त केले. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. कारण, त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण, मला असे सांगण्यात आले होते की, विजयी मेळावा होणार आहे. पण, त्याठिकाणी रुदालीचे भाषण देखील झाले. मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकार द्या, आम्हालाच निवडून द्या. त्यामुळे हा मराठीचा विजय उत्सव नव्हता तर रुदाली होती. त्या रुदालीचे दर्शन आपण घेतलेले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव यांच्यावर टीका केली.
 
मराठी माणसांनी ताकद दाखवली 
 
मराठी विजयी मेळाव्यात उद्धव आणि राज हे दोघे बंधू जवळपास दोन दशकांनंतर एकत्र आले. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी वरळीच्या डोममध्ये हजारो लोकांनी गर्दी केली होती. आठ हजार आसन क्षमतेचे सभागृह तुडुंब भरले होते. तेवढेच लोक बाहेर उभे होते. दुपारी १२ च्या सुमारास विजयोत्सव सुरू झाला. निवेदकांनी उद्धव व राज यांच्या आगमनाची वर्दी दिली. हे दोन्ही बंधू व्यासपीठावर येत असताना संपूर्ण सभागृहात अंधार करण्यात आला. मात्र, हा क्षण पाहण्यासाठी अधीर झालेल्या लोकांनी आपल्या मोबाइलचे टॉर्च सुरू केले. अधीरता वाढत असतानाच सभागृह पुन्हा दिव्याच्या प्रकाशांनी उजळले आणि  ठाकरे बंधू व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंकडून समोर येताना दिसले. दोघांनीही जमलेल्या जनसागराला हात उंचावून, नमस्कार करून अभिवादन केले. उद्धव यांनी राज यांच्या खांद्यावर हात टाकला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. अवघे वातावरण भारून गेले. सारे काही डोळ्यांसमोर घडत असतानाही हा क्षण मोबाइलच्या कॅमेर्‍यात टिपण्याचा मोह लोकांना आवरत नव्हता.

 

Related Articles