कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला   

बोगोटा : कोलंबियाचे सिनेटर मिगुएल उरिबे यांच्यावर बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. उरिबे हे २०२६ ची अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उरिबे यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. उरिबे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
 
उरिबे हे कोलंबियाचे माजी अध्यक्ष अल्वारो उरिबे यांनी स्थापन केलेल्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे सदस्य आहे. रक्ताने माखलेल्या उरिबे यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झालेली दिसून येत आहे. फोन्टिबोन जिल्ह्यात त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर उरिबे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती बगोटाचे मेयर कार्लोस गॅलन यांनी दिली. जर त्यांना दुसर्‍या रुग्णालयात हलवाण्याची गरज भासली तर त्यासाठी संपूर्ण रुग्णालयाचे नेटवर्क अलर्टवर असल्याचेही त्यांनी सांगितले. हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले.
 
कोलंबियन सरकारने या हल्ल्याचा निषेध करत एक निवेदन जारी केले आहे, तर कोलंबियन अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत सेनेटर उरिबे यांच्या कुटुंबियांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, की तुमच्या वेदना कशा कमी कराव्या मला माहिती नाही.
 

Related Articles