‘आरएलडी’मधून सिद्दीकी बाहेर   

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) उपाध्यक्ष शाहिद सिद्दीकी यांनी सोमवारी पक्षास सोडचिठ्ठी दिली. आपण पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सिद्दीकी यांनी काल जाहीर केले. तसेच, आपला राजीनामा पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याकडे पाठवून दिला.  भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आरएलडी राष्ट्रीय लोक दल नुकताच सहभागी झाला. त्यापाठोपाठ, सिद्दीकी यांनी आरएलडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय लोक दलाच्या सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जयंत सिंह यांच्याकडे पाठवला असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. आज देशाची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आली असून अशा परिस्थितीत गप्प राहणे हे पाप आहे, असे त्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मी जयंतजींचा आभारी आहे; पण मला जड अंतःकरणाने आरएलडीपासून दूर जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आरएलडीने उत्तर प्रदेशातील दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बिजनौरमधून चंदन चौहान आणि बागपतमधून राजकुमार सांगवान यांना पक्षाने तिकीट दिले आहे. 
 

Related Articles