महायुतीत सातारा मतदारसंघ भाजपकडे, की राष्ट्रवादीकडे?   

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे, की राष्ट्रवादीकडे राहणार? याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यातच महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही.
 
खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडे शरद पवार गटाकडे तगडा उमेदवार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन वेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदार चव्हाण यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सर्व राजकीय घडामोडीत राजकीय पक्षांचा उमेदवारीचा तिढा सुटेना, अशी स्थिती असल्याने सामान्य मतदार मात्र संभ्रमात पडल्याचेच दिसून येत आहे. उमेदवारीचे घोडे नेमके अडले कुठे? अशी लोकांतून विचारणा होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यातच तुल्यबळ लढत होईल, असे काही दिवसांपर्यंतचे चित्र होते. मात्र, भाजपने अद्यापही उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केलेली नाही. दिल्लीवारी करून आल्यावर तरी उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यानंतरच्या यादीतही सातार्‍याच्या उमेदवारीचा समावेश नाही. त्यामुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचवेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले. मात्र, विरोधात उदयनराजे संभाव्य उमेदवार असल्यास आमदार शिंदे, आमदार पाटील यांची कितपत डाळ शिजेल? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती महाआघाडीला आखावी लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी  अजित पवार गटाची अंतर्गत लगबग सुरू असल्याचे दिसते.
 

Related Articles