मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांना रोखले   

मोटारीवर दगडफेकीचा प्रयत्न 

 
नांदेड : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी  गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मराठा आंदोलकांचा  आक्रमकपणा पाहून चव्हाण यांना प्रचारातून माघारी परतावे लागले. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. 
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी सोमवारी अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथे गेले होते. त्यावेळी मराठा आंदोलकांनी ते गावात प्रवेश करताच त्यांचा ताफा  अडविला. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यावेळी  चव्हाण यांना जाब विचारण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु गावकर्‍यांचा रोष वाढत असल्याचे पाहून अशोक चव्हाण यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. चव्हाण यांचा ताफा परत नांदेडच्या दिशेने परतत असताना काही तरूणांनी त्यांच्या मोटारीवर दगडफेक करण्याचा देखील प्रयत्न केला.मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची   धग मात्र अजूनही कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येते. नांदेड जिल्ह्यात येणार्‍या विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नेत्यांना प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
 

Related Articles