शरद पवार गटातून रमेश बारसकर यांची हकालपट्टी   

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेले मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
 
राष्ट्रवादीतील फुटीनंतर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, बारसकर हे शरद पवार यांच्यासोबत कायम होते. बारसकर यांनी महाविकास आघाडीमधून माढा लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली. त्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघासाठी  वंचितकडून बारसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या आदेशानुसार बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बारसकर यांच्या हकालपट्टीबरोबरच त्यांनी नियुक्ती केलेली राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव मेळावा माढा लोकसभा मतदारसंघात घेण्यात आला होता, त्यातूनच माझी उमेदवारी निश्चित झाली. माढ्यातील जनतेने विश्वास दाखवला, तर तरुणांचे प्रश्न सोडवण्यावर भर देईन, असे बारसकर यांनी म्हटले आहे.
 

Related Articles