बुलडाण्यात महायुतीत बंडखोरी   

बुलडाणा : बुलडाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे यांच्या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपचे पक्षश्रेष्ठी शिंदे यांची समजूत घालण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
 
प्रतापराव जाधव यांच्याकडून भाजपाच्या आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर आणि भाजपा पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच कार्यक्रमादरम्यान बॅनरवर त्यांचे कोठेही फोटो नाहीत, यामुळेच ही नाराजी असल्याचे विजयराज शिंदे यांनी बोलून दाखवले आहे. दरम्यान, बुलडाण्यातून याआधी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गायकवाड यांनी माघार घेतली होती. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी शिंदे यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

Related Articles