खासदार अनुभव मोहंती भाजपमध्ये   

नवी दिल्ली : अभिनेते आणि ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचे खासदार  अनुभव मोहंती यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मोहंती यांनी कमळ हाती घेतले. 
 
मोहंती हे केंद्रपाराचे खासदार आहेत. अलीकडेच बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता. भाजप प्रवेशानंतर मोहंती म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत संसदेत तिहेरी तलाकची प्रथा बंद करणे आणि नवीन गुन्हेगारी कायदे आणणे यासह अनेक ऐतिहासिक विधेयके मंजूर झाल्याचे पाहून मला अभिमान वाटत आहे. भाजप सरकारने अनेक धाडसी पावले उचलली असून, विकसित भारतासाठी लोकांनी मोदींना साथ दिली पाहिजे.
 
तावडे म्हणाले की, विरोधक एकत्र येऊन ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येत नाही. ज्यांना विकसित भारताची आस्था आहे ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रादेशिक पक्ष सोडणारे आणि भाजपमध्ये सामील होणारे भर्त्रीहरी महताब यांच्यानंतर मोहंती हे दुसरे विद्यमान बीजेडी खासदार आहेत. २०१९ मध्ये केंद्रपारा येथून लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी मोहंती राज्यसभा सदस्य होते.
 

Related Articles