भारतीय उत्पादनांवर बहिष्काराचे आवाहन; शेख हसीना यांनी विरोधकांना फटकारले   

ढाका : भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी करणार्‍या देशातील विरोधी पक्षाच्या खासदारांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी फटकारले आहे.  ज्या नेत्यांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासंदर्भात  मोहीम सुरू केली आहे, त्यांनी त्यांच्या पत्नीकडे किती भारतीय साड्या आहेत आणि त्या का जाळत नाहीत? असा तिखट सवाल त्यांनी केला.अवामी लीगच्या सभेत शेख हसीना बोलत होत्या. मालदीवप्रमाणे बांगलादेशातही शेख हसीना आणि भारताला लक्ष्य करणारी ‘इंडिया आऊट मोहीम’ बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने सुरू केली आहे. त्याचा समाचार घेताना शेख हसीना म्हणाल्या, ज्या विरोधी पक्षातील या नेत्यांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, त्यांच्या पत्नीकडे किती भारतीय साड्या आहेत? आणि ते त्यांच्या पत्नीकडून साड्या घेऊन त्यांना आग का लावत नाहीत? हे त्या नेत्यांनी सांगावे. त्यांनी भारतीय मसाल्यांवरही भाष्य केले. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरातील स्वयंपाकघरात भारतीय लसूण, कांदा, आले, गरम मसाला आणि इतर मसाले वापरले जात नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

Related Articles