व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांनी कपात   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी ३०.५ रुपयांची कपात केली आहे. त्याचा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसारख्या आस्थापनांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचे दर कायम आहेत.  त्यामुळे राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर १,७६४.५० रुपये झाला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८०३ रुपयांवर कायम आहे.
 
जानेवारीनंतर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रथमच कपात झाली होती. १ फेब्रुवारीला व्यावसायिक सिलिंडर १४ रुपये आणि १ मार्च रोजी २५.५ रुपयांनी महागला होता. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर पूर्वी १,७९५ रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर १,९११ रुपयांऐवजी १८७९.०० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत १,७४९ रुपयांऐवजी १,७१७.५० रुपये द्यावे लागणार आहेत. चेन्नईत हा सिलिंडर १९३०.०० रुपयांना मिळणार आहे.
 

एटीएफच्या दरात किरकोळ कपात

 
देशात जेट इंधन म्हणजेच एटीएफच्या (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरात सोमवारी किरकोळ कपात करण्यात आली. राजधानी दिल्लीत  एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) किंमत प्रति किलोलीटर ५०२.९१ रुपये किंवा ०.३९ टक्के कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत एटीएफ १००,८९३.६३ रुपये प्रति किलोलीटर दराने मिळणार आहे. मुंबईत एटीएफ दर ९४,८०९.२२ रुपयांवरून ९४,४६६.४१ रुपये प्रति किलो झाले आहे.
 

Related Articles