काँग्रेसला दिलासा; तूर्तास कारवाई नाही   

प्राप्तिकर विभागाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

 
नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची खाती गोठवितानाच विविध नोटिसा बजावत साडेतीन हजार कोटी भरण्यास सांगणार्‍या प्राप्तिकर विभागाने सोमवारी काँग्रेसला मोठा दिलासा दिला. सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान कर अथवा दंडाच्या वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करणार नाही, असे स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिले. आता या प्रकरणावर २४ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
 
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या पीठासमोर प्राप्तिकर विभागाची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणतीही तडकाफडकी कारवाई केली जाणार नाही, असे सांगितले.प्राप्तिकर विभागाने नुकत्याच काँग्रेसला दोन नोटिसा बजावल्या. याअंतर्गत प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला १,८२५ आणि १,५६७ कोटी असे अंदाज ३५०० कोटी भरण्यास सांगितले. 
 
या विरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, न्यायालयाने काँग्रेसला प्राप्तिकर लवादाकडे जाण्यास सांगितले होते. यानंतर, पक्षाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर काल सुनावणी पार पडली.काँग्रेस पक्षातर्फे काल ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी बाजू मांडली. तर, सरकारतर्फे तुषार मेहता यांनी बाजू मांडली. 
 
यावेळी सिंघवी यांनी, केंद्राने पक्षाच्या मालमत्ता जप्त करून १३५ कोटी वसूल केले आहेत. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत, नफा कमावणारी संस्था नाही, असे सांगितले. त्यावर, प्राप्तिकरतर्फे मेहता यांनी २०१६ च्या निवाड्याआधारे आम्ही १७०० कोटींचा कर भरण्यास काँग्रेसला सांगितले होते. पण, सध्या निवडणुका सुरू आहेत. अर्जदार काँग्रेस राजकीय पक्ष आहे. निवडणूक काळात पक्षाची अडचण करणार नाही. तसेच, या प्रकरणाची अंतिम सुनावणी होईपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही, असे सांगितले.
 
प्राप्तिकर विभागाने रविवारी नोटीस बजावताना २०१४-१५ साठी ६६३, २०१५-१६ साठी ६६४ आणि २०१६-१७ साठी ४१७ कोटींच्या कराची मागणी केली. तर, तीन दिवसांपूर्वी १,८२३ कोटींच्या कराची मागणी करण्यात आली होती. हा कर २०१७-१८ ते २०२०-२१ या वर्षातील आहे. कराच्या रकमेवर दंड आणि व्याजही लावण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पैसे नसल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. 
 

Related Articles