केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी   

१५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

 
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने सोमवारी १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर, त्यांची रवानगी तिहारच्या कारागृहात करण्यात आली.  दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर, दोन टप्प्यांत २७ मार्च आणि १ एप्रिलपर्यंत न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली.  केजरीवाल तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या अधिकार्‍यांनी काल न्यायलयात सांगितले. तसेच, १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी ईडी अधिकार्‍यांनी न्यायालयात केली. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
 

‘आप’च्या दोन मंत्र्यांची नावे

 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान ‘आप’ नेते आणि राज्यमंत्री आतिशी व सौरभ भारद्वाज यांचे नाव घेतले, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान केला. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात ‘आप’चे माध्यम प्रमुख आणि व्यापारी विजय नायर यांनादेखील अटक झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती नायर याने आपणास दिली नाही. नायर याचा आतिशी आणि भारद्वाज यांच्याशी संवाद होत होता, असे केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान सांगितले असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यावरुन, भाजपने केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
 

Related Articles