मध्य भारतात उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रात प्रभाव   

एप्रिलमध्ये तपमान ४२, तर मे मध्ये ४४ अंशांपर्यंत जाणार 

पुणे : देशासह मध्य महाराष्ट्रात या वेळी उष्णतेची लाट येणार आहे. त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जाणवणार आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा आदी भागांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज मे महिन्याच्या अखेरीस देण्यात येईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी पृथ्वी मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी कमल किशोर आदी उपस्थित होते. याप्रसंगी हवामान खात्याने उष्णतेची माहिती देण्यासाठी काय-काय उपाययोजना केल्या आणि कशाप्रकारे त्या राबविल्या जातील, त्याची माहिती दिली.
 
महापात्रा म्हणाले, यंदा तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य भारतामध्ये याचा अधिक परिणाम जाणवणार आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमालचल प्रदेश, बंगाल, महाराष्ट्राचा समावेश आहे. तसेच समुद्रकिनारी असलेल्या भागातही त्याचा फटका बसेल. एप्रिल महिन्यात देशातील सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. जवळपास ३९.२ मिमी पावसाची नोंद होईल. देशात १ ते ७ एप्रिल दरम्यानचे तपमान सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल.
 
मार्च महिन्यामध्ये सरासरी ४० अंश तपमानाची नोंद झालेली आहे. एक-दोन अंशाच्या वरखाली झाले. आता एप्रिल महिन्यात यामध्ये दोन ते तीन अंशाने वाढ होईल. त्यामुळे एप्रिल महिन्यातील कमाल तपमान हे ४२ अंशांपर्यंत जाईल आणि मे महिन्यात साधारणपणे ४४ अंशापर्यंत त्याची नोंद होऊ शकते, असेही महापात्रा यांनी सांगितले.
 
किरण रिजीजू म्हणाले, तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याने आणि लोकसभेच्या निवडणुकाही असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. कारण निवडणुकीमुळे सर्वांना घराबाहेर पडावे लागेल. आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचे पालन सर्वांनी करावे.
 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाडा; विदर्भात उष्णतेची लाट 

 
पुणे : हवेतील आर्द्रतेमुळे दिवसभर, तसेच रात्रीही उबदार वातावरण राहात आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे अस्वस्थता वाढत आहे. दोन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत अधिक उकाडा जाणवणार आहे. तर विदर्भात येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने सोमवारी दिला आहे.वातावरणातील खालच्या स्तरातील वार्‍यांमध्ये द्रोणीका रेषा तयार झाली आहे. ती रेषा विदर्भातून जात आहे. संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे असणार आहे. मध्य महाराष्ट्रील सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे अधिक प्रमाणात उकाडा जाणवणार आहे. विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे ४ व ५ एप्रिल, तर यवतमाळ जिल्ह्यात ४ एप्रिलला उष्णतेची लाट येणार आहे. राज्यातील अनेक भागात कमाल तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तपमान सामान्यपेक्षा अधिक आहे. उबदार हवेमुळे रात्री अस्वस्थता वाढत आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस टिकून असणार आहे. 
 
मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात किमान तपमानात किंचित वाढ झाली. राज्यात काल सोलापूर येथे उचांकी ४१ अंश कमाल, तर पुणे येथे नीचांकी २०.३ अंश किमान तपमानाची नोंद झाली. 
 
पुणे व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. कमाल तपमानात एक ते दोन अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. तर किमान तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज आहे. शहरात काल ३९ अंश कमाल, तर २०.३ अंश किमान तपमानाची नोंद झाली. वाढलेल्या तपमानामुळे सकळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घराबाहेर पडताना पांढरी कपडे परिधान करावे. तसेच अधिकच्या उकाड्यामुळे भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 

शहरातील तपमान

ठिकाण कमाल किमान
पाषाण ३८ अंश २१.४ अंश
शिवाजीनगर ३९ अंश २०.३ अंश
मगरपट्टा ३९ अंश २६.४ अंश
लोहगाव ३९ अंश २३.७ अंश
एनडीए ३९ अंश १९.३ अंश
कोरेगावपार्क ४१ अंश २५ अंश

 

 

Related Articles