नवीन महापालिका आयुक्तांची रंगरंगोटी आणि फर्निचरवरती उधळपट्टी   

पुणे : महापालिका आयुक्त यांनी महापालिकेत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच पालिका आयुक्त कार्यालयात रंगरंगोटी आणि फर्निचरच्या कामाला सुरुवात केली आहे. महापालिकेतील फर्निचर आणि रंग चांगले असताना यावर उधळपट्टी केली जात असल्याचे चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
 
महापालिकेत अधिकार्‍यांची बदली होत असते. नवीन अधिकारी आले की ते स्वत:ला हवे तसे कार्यालय करून घेताना दिसून येतात. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च केले जातात. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांची आपेक्षित वेळे पेक्षा आधीच काही कारणाने बदली होत असते. त्यानंतर नव्याने आलेल्या अधिकार्‍याकडून पुन्हा त्याच कामासाठी खर्च केला जातो. त्यामुळे विनाकारण हा जनतेच्या पैशांची उधळपट्टी महापालिकेकडून केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता नव्याने आलेल्या आयुक्तांनी देखील कार्यालय सजविण्याचे काम हाती घेतले आहे. कार्यालयात रंग आणि फर्निचर चांगले आणि सुस्थितीत असताना देखील हे काम हाती घेतल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयातील फर्निचर देखील नव्याने केले जाणार असल्याची माहिती भवन विभागाने दिली आहे. गरज नसताना रंगरंगोटी करुन जनतेच्या कररुपी पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे समोर आले आहे.
 
महापालिकेतील गेल्या काही दिवसात आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त आणि तीन उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आता यांच्या जागेवर नव्याने आलेले किंवा येणारी अधिकारी देखील त्यांच्या कार्यालयातील रंग आणि फर्निचर नव्याने करुन घेणार का असा देखील प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागात आणि पहिल्या मजल्यावर देखील फर्निचरची कामे केली जात आहेत. त्यामुळे पालिकेत नागरिकांच्या कामांपेक्षा अधिकार्‍यांची दालने सजविण्यावरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
 
महापालिकेतील कोणतेही काम करताना जे काम करायचे आहे, त्यासाठी खर्च ठरवला जातो. अपेक्षित किती खर्च येईल हे लक्षात घेवून त्यासाठी निधीची तरतुद केली जाते. तसेच चार ते पाच लाख रुपये रंगासाठी खर्च लागणार असून फर्निचरसाठी किती खर्च लागणार आहे, याची माहिती नसल्याचे भवन विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले.
 

Related Articles